पुन्हा गोदाकाठ नॉट रिचेबल.

1 min read

पुन्हा गोदाकाठ नॉट रिचेबल.

तालुक्यातील गोदाकाठच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न सुटायचे नाव घेत नाही. थोडा पाऊस झाला तरी गोदाकाठची दहा गावे कायम संपर्क विहीन होतात.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठची गावे पुन्हा नॉट रिचेबल झाली आहेत. पाणी वाहून जाणारे पाईप शेतकऱ्याने काढल्याने गोदाकाठची रहदारी पुन्हा ठप्प झाली आहे.
सोनपेठ तालुक्यातील गोदाकाठच्या रस्त्याचा गंभीर प्रश्न सुटायचे नाव घेत नाही. थोडा पाऊस झाला तरी गोदाकाठची दहा गावे कायम संपर्क विहीन होतात. या गावांना जोडणाऱ्या नाल्यात कायम पाणी राहत असल्याने राजेश विटेकर यांनी या नाल्यात पाईप टाकून रस्ता रहदारी योग्य बनवला होता. गेल्या चार दिवसात झालेल्या प्रच़ंड पावसाने नदी नाले भरुन वाहत आहेत.

या रस्त्यावरील नाल्यात पाणी साचल्याने एका शेतकऱ्याने हे पाईप रात्री जेसीबीने काढून टाकले. त्यामुळे रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. पाणी वाहून जात नसल्याने, आजुबाजुच्या शेतात पाणी साचले आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुक पुर्णपणे ठप्प आहे. सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दहा गावात आरोग्य आणीबाणी निर्माण झाल्यास मोठी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.

या दहा गावातील नागरिकांनी तहसिलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांची भेट घेऊन रस्त्याची समस्या कायम स्वरुपी संपवण्याची विनंती निवेदन देऊन केली आहे. तहसिलदारांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ रस्ता दुरुस्त करुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुचना दिल्या आहेत. या निवेदनावर सुर्यकांत कदम, प्रताप भंडारे, मंगेश रोडे, सोमनाथ नागुरे, देवीदास भुजबळ, सचीन रोडे, अरुण कदम, बाबू रणखांबे, माऊली रणखांबे आदी़ंच्या स्वाक्षऱ्या आहेत.