गोदाकाठच्या गावांचा संपर्क  तुटला

1 min read

गोदाकाठच्या गावांचा संपर्क तुटला

रस्त्यासाठी अकरा गावांनी टाकला होता मतदानावर बहिष्कार

सिद्धेश्वर गिरी/ सोनपेठ :रस्त्यासाठी विधानसभेच्या निवडणूकीवर कडकडीत बहीष्कार टाकणारी गावे पुन्हा संपर्काच्या बाहेर गेली असुन.नागरीकांना बाहेर पडण्यासाठी कंबरे इतक्या पाण्यातुन चालत जावे लागत आहे.
रस्त्याच्या दुरावस्थेसाठी प्रसिद्ध असलेल्या सोनपेठ तालुक्यातील नागरीकांचे रस्त्यासाठीचे हाल सुरुच आहेत.यावर्षी झालेल्या पहिल्या चांगल्या पावसाने गोदाकाठच्या नागरीकांचे हाल पुन्हा सुरु केले आहेत.शेळगाव रस्त्यावरील नाल्यात पाणी आल्याने गोदाकाठच्या थडीउक्कडगाव,वाडीपिंपळगाव थडीपिंपळगाव,गंगापिंपरी ,गोळेगाव,लोहीग्राम या गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क पुन्हा तुटला आहे.कोरोनासारख्या संकट काळात ही गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेली आहेत.दिवाळीत झालेल्या अवकाळी अतीवृष्टीमुळे ही गावे संपर्क विहीन झाली होती.त्यावेळी या अकरा गावातील तरुण मंडळाने पुढाकार घेऊन विधानसभेच्या निवडणूकीवर बहिष्कार घातला होता.त्यावेळी गावात एकही मतदान झाले नव्हते.गावकऱ्यांच्या मोठ्या एकजुटीनंतरही प्रशासन किंवा पदाधिकारी यांनी गोदाकाठच्या या गावांच्या मूलभुत प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेले होते.
९ जुलै रोजी रात्री तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसाने गोदाकाठच्या गावांना तालुक्याशी जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर शेळगावजवळ पाणी आल्यामुळे नागरीक अडकुन पडले होते.नागरीकांना कंबरेएवढ्या पाण्यातुन वाट काढत शेळगाव गाठावे लागले.
विधानसभा निवडणुकीवर बहिष्कारासारखे आंदोलन करुनही प्रशासनाला गोदाकाठच्या नागरीकांच्या समस्या सोडवता येत नसतील यासारखी लाजीरवानी बाब कोणती असा सवाल गोदाकाठवासियांमधुन उपस्थित केला जात आहे.त्याचबरोबर यापुढे प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन न्याय नाही दिल्यास गोदाकाठचे नागरिक  तीव्र आंदोलन करतील असा इशाराही गोदाकाठच्या नागरीकांनी माध्यमांशी बोलतांना दिला आहे.