औरंगाबाद : राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील नागद, सायगव्हान येथे शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. राज्यात सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. असले तरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे कबूल करत पैसे उभा करु, असेही भुसे म्हणाले.
दुसरीकडे राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील सोयगाव तालुक्यातील काही गावांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी नुकसानीच्या व्यथा सत्तार यांच्या समोर मांडल्या. त्यावेळी सत्तार म्हणाले की, सरकार कडे पैसा नाही सर्व पैसा कोरोना उपचारांसाठी लावला आहे. पुढील तीन महिने तरी हा पैसा उभा करणं शक्य नाही. पण शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे वार्यावर सोडणार नाही वेळ प्रसंगी कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करू, असंही सत्तार म्हणाले.
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुढील तीन महिने शेतकऱ्याला मदत करणे शक्य नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळणे शक्य नाही हे या दोन्ही मंत्र्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं आहे. शेतकऱ्यांना रब्बीची पेरणी करण्यासाठी आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात कोरडा दुष्काळ होता. आता ओला दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत.