राज्यात दिवाळीनिमित्त सरकारच्या गाइडलाइन्स जारी.

1 min read

राज्यात दिवाळीनिमित्त सरकारच्या गाइडलाइन्स जारी.

या आहेत महत्त्वाच्या सूचना

१. राज्यात प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे करण्यात आलेले आहेत. आता दिपावली सणही अन्य सण-उत्सवांप्रमाणे पूर्ण खबरदारी घेऊन साधेपणाने साजरा करावा.

२. करोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे अद्याप खुली करण्यात आलेली नाहीत. ही बाब ध्यानात घेऊन दिवाळी घरगुती स्वरूपातच साजरी करावी. उत्सव काळात विशेष करून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे. नागरिकांनी गर्दी टाळावी, एकत्र येऊ नये, मास्कचा वापर करावा आणि सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळावे. म्हणजे करोना संक्रमण वाढणार नाही

३. दिवाळी हा दिव्यांचा उत्सव मानला जातो. मात्र, या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदूषणाची पातळी वाढून सर्वांच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या स्थितीत करोना बाधित रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा अधिकच त्रास होण्याची भीती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी यंदा फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणावर करून उत्सव साजरा करावा.

४. दिवाळीदरम्यान कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक उत्सव वा कार्यक्रम (उदा. दिवाळी पहाट) आयोजित करण्यात येऊ नयेत. असा कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक अशा माध्यमांतून करावा.

५. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम-शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. या माध्यमातून करोना, मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. तेथेही लोकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता बाळगावी.

६. कोविड १९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे संबंधित विविध विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक असेल.