ग्रामपंचायत निवडणुक; कही खुशी कही गम

कुणाची प्रतिष्ठा कायम तर कुणावर आत्मचिंतनाची वेळ

ग्रामपंचायत निवडणुक; कही खुशी कही गम

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. या ग्रामपंचायत निकालात 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती दिसून आली तर राजकीय मातब्बरांना प्रतिष्ठेचा विषय केलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये देखील काहींना आपली प्रतिष्ठा जपता आली तर काही जणांवर आत्मचिंतनाची वेळ आल्याचे चित्र या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यामध्ये अनेक राजकीय मातब्बरांनी आपापल्या ग्रामपंचायत निवडणुकीला प्रतिष्ठेचा विषय बनविला होता. जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या आखाडा बाळापूर ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस प्रणित पॅनल 17 पैकी 13 जागांवर दणदणीत विजय मिळविला तर कळमनुरी तालुक्यातील नांदापूर ग्रामपंचायतीवर जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी प्रतिष्ठेचा विषय करत ९ पैकी ८ जागांवर आपले उमेदवार विजयी करीत प्रतिष्ठा जपली.

तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांचे गाव असणाऱ्या किन्होळा ग्रामपंचायतीवर जनता महाविकास आघाडीच्या पॅनलने 9 पैकी 9 जागा जिंकून ॲड. जाधव यांच्या पॅनलचा दारुण पराभव केला. या पराभवामुळे जाधव यांच्यावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. हिंगोली शहरालगत असणाऱ्या बळसोंड ग्रामपंचायत विजयाकरीता जोरदार रस्सीखेच झाली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रणित असलेल्या पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचाराकरीता चक्क अब्दुल सत्तार नावाचे मंत्री महोदय देखील येऊन गेले. परंतु विनायक भिसे आणि पप्पू चव्हाण या भाजपच्या नवनियुक्त नेत्यांनी जलक्रांती पॅनल च्या माध्यमातून तेराच्या तेरा जागांवर एकतर्फी विजय नोंदवित महाविकास आघाडीला तोंडावर पाडले आहे.

अनेक वर्षांपासून जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच साहेबराव पाटील गोरेगावकर व भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी एकत्र येत एकता पॅनलच्या माध्यमातून उमेदवारांसमोर पर्याय उभा केला होता. त्यांच्या विरोधात भाजपचे रवी पाटील यांच्यासह संजय पाटील व इतरांनी ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून आव्हान दिले होते. या निवडणुकीत एकता पॅनलने 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवून ग्रामपंचायत काबीज केली. तर ग्राम विकास आघाडीला सात जागांवर समाधान मानावे लागले.

औंढा तालुक्यातील पिंपळदरी त्याचबरोबर हिंगोलीतील नरसी नामदेव व कळमनुरी मधील शेवाळा ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रणित असलेल्या उमेदवारांनी विजय मिळवित ग्रामपंचायत काबीज केली. औंढा नागनाथ तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळा बाजार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वंचितच्या वतीने मुनीर पटेल यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु शिवसेना -राष्ट्रवादी -काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीच्या प्रणित असलेल्या पॅनेलने मुनीर पटेल यांच्या पॅनलचा दारुण पराभव केला.

हिंगोली तालुक्यातील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उद्धव गायकवाड यांची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडाळा ग्रामपंचायतीवर भाजपने सुरुंग लाूवत विजय मिळविला. जिल्ह्यातील या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालातून अनेक मातब्बरांना आपली प्रतिष्ठा जपत आली तर काही जणांना आत्मचिंतनाची वेळ आल्याचे चित्र दिसून आले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.