विजय कुलकर्णी / परभणी : येथील जिंतूर राॕदिनर्स सायकल क्लबच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ते ३ जानेवारी रोजी जिंतूर-औरंगाबाद-नेवासा फाटा-नगर-सुपा दरम्यान ६०० किमी लांब पल्ल्याच्या सायकलिंगचे आयोजन करण्यात आले होते. सहा सायकलस्वारांनी कडाक्याच्या थंडीत ६०० किमी सायकलिंग करून सावित्रीबाई फुलेंना अनोखे अभिवादन केले.
अनंत अडीअडचणींना बळी न पडता भारतीय स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी स्त्रियांमध्ये ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ऑडक्स इंडिया या राष्ट्रीय सायकल क्लबशी संलग्नित जिंतूर रॉदिनर्स सायकल क्लबच्या वतीने जिंतूर-औरंगाबाद-नेवासा फाटा-नगर- सुपा दरम्यान ६०० किमी ब्रेवेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी धनश्री मापारी, ज्ञानबा मापारी, देवेंद्र भुरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी स्पर्धेत सहभागी सायकलस्वारांना झेंडा दाखविला. यात बेंगलोर येथील रोहीत बीडकर, परभणी येथील खुद्दुस शेख व जिंतूर येथील यज्ञेश मापारी, दुर्गेश नहातकर, यासीन खान, शहेजाद खान यांचा सहभाग होता. या सायकलस्वारांनी कडाक्याच्या थंडीत तब्बल ३९ तास, दिवस आणि रात्र ६०० किमी सायकलिंग करून सावित्रीबाई फुले यांना अनोखे अभिवादन केले. सायकल स्वारांच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.