लॉकडाऊन निषेधार्थ पालकमंत्र्यांना घालणार घेराव

1 min read

लॉकडाऊन निषेधार्थ पालकमंत्र्यांना घालणार घेराव

विराट राष्ट्रीय लोकमंच इशारा

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यामध्ये 6 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. सदर लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता व विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याने लॉकडाऊन रद्द करावा अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने देण्यात आली होती. परंतु याबाबत प्रशासनाने कुठलाही विचार न केल्याने 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांना घेराव घालून निवेदन देणार असल्याचा इशारा विराट राष्ट्रीय लोक मंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी दिला आहे.

विराट राष्ट्रीय लोक मंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल

जिल्ह्यामध्ये 6 ऑगस्टपासून लॉकडाऊन डाऊन जाहीर झाल्यानंतर हा मागे घेण्यात यावा यासाठी अनेकांनी निवेदने दिली होती. लॉकडाऊनमुळे काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळत आहे. हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा मोठा प्रादुर्भाव नसताना देखील लॉकडाऊन करणे म्हणजे नागरिकांवर अन्याय करण्यासारखे आहे. याच बरोबर शहरातील सर्व ऑनलाइन सेंटर बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडे वारंवार मागणी करून देखील लॉकडाऊन रद्द न केल्यामुळे 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांना घेराव घालून निषेधाचे निवेदन देण्यात येणार असल्याचे विराट राष्ट्रीय लोकमंचचे शेख नईम शेख लाल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.