पदभार स्वीकारताच पाटलांचा धडाका

1 min read

पदभार स्वीकारताच पाटलांचा धडाका

प्रशासनात राबविणार सिंधुदुर्ग पॅटर्न

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: हिंगोलीचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारताच कामाचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचा कारभार सुधारण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग पॅटर्न राबविणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
हिंगोलीचे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे समस्त हिंगोलीकरांची मने जिंकली होती. त्यामुळे त्यांच्या बदलीनंतर मोठ्या प्रमाणात जनक्षोभ निर्माण झाला होता. अखेर शासनाने त्यांची जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून हिंगोली येथे बदली केली आहे. बुधवारी पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन कार्यालयाचे कामकाज सुरळीत करण्याचा धडाका लावला. त्या अनुषंगाने गेल्या अनेक वर्षापासून अडगळीत पडलेल्या कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे प्रशासकीय व्यवहार ऑनलाइन करण्यात येणार असून नगरपालिकांना आयएसओ दर्जा मिळवून देण्याच्या उद्देषाने काम करण्यात येणार आहे. येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका अंतर्गत सर्व प्रकरणी निकाली काढून झिरो पेंडन्सी अभियान राबविण्यात येणार आहे.

रामदास पाटील

जिल्हा प्रशासन कार्यालयातील सर्व अभिलेखे वर्गवारीनुसार ठेवण्यात येणार असून सर्व अभिलेखांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. प्रशासनातील रिक्त जागा प्रतिनियुक्तीने भरण्यात येणार आहेत. नगरपालिका राज्यात अग्रेसर राहतील यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे. घरकुल व स्वछता याचा सतत पाठपुरावा केला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी देखील विशेष मोहीम राबविण्यात येणार असून कर्मचारी आस्थापना संदर्भातील प्रलंबित विषय कॅम्प घेऊन मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास पाटील यांनी दिली आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून धूळ खात पडलेल्या कार्यालयाचे स्वच्छतेचे काम हाती घेऊन कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील नगरपालिकाचा कारभार आणखी सुधारेल असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.