हिंगोली धोका वाढला नियोजनाच्या अभावाने रूग्ण संख्येत वाढ

1 min read

हिंगोली धोका वाढला नियोजनाच्या अभावाने रूग्ण संख्येत वाढ

आजघडीला शहरात ४५ कोरोनाबाधित रूग्ण आढळुन आले असून त्यापैकी सहा जण उपचारातून बरे झाले असून ३८ जणांवर उपचार सुरू आहेत. विशेष बाब म्हणजे शहरातील तीन रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

प्र्द्युम्न गिरीकर/हिंगोली- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या सुरूवातीच्या काळात हिंगोली शहरामध्ये प्रशासनाच्या वतीने अतिशय सुक्ष्म नियोजन करण्यात आल्यामुळे शहरातील प्रादुर्भाव रोखण्यात यश आले होते, परंतू गेल्या काही दिवसात नियोजन ढासळल्यामुळे रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आजघडीला शहरात ४५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यापैकी सहा जण उपचारातून बरे झाले. ३८ जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील तीन रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

वसमतचा पहिला रूग्ण वगळता जिल्ह्यात कोरोना संक्रमित असलेल्या जवानांच्या राज्य राखीव दलाची तुकडी बंदोबस्तावरून परतल्यानंतर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे व तत्कालीन न.प.मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी तात्काळ हालचाली करून सदर तुकडीचे विलगीकरण करण्यासह शहरामध्ये सुक्ष्म नियोजन केले होते. अर्थात या दोन्ही अधिकाऱ्यांच्या भुमिकेला जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवळी निर्णय घेऊन पाठिंबा दिला. कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या काळात शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे रामदास पाटील यांची बदली करण्यात आली.

राजकीय हितसंबंधातून पाटील यांची बदली झाल्यानंतर शहरात त्यांच्या बाजुने मोठी जनभावना देखील उमटली. परंतू, याचा शासन स्तरावर विचार झाला नाही. नव्याने दाखल झालेले मुख्याधिकारी कुरवाडे हे दक्ष (?) असले तरीही शहराची पुरेशी नसलेली जाण व प्रशासकीय कामकाज हाताळण्याची स्वतंत्र पद्धत यामुळे शहरातील सर्व नियोजन ढासळले आहे. परिणामी शहरातील विविध भागांमध्ये संक्रमित रूग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी पहाटेपर्यंत जिल्ह्यात दगावलेल्या सहापैकी ३ रूग्ण ते केवळ हिंगोली शहरातील आहेत. तर ४५ रूग्ण बाधित म्हणून समोर आले आहेत. संक्रमणाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोणातून उपाययोजना होत नसल्याने ही संख्या वाढतच जात आहे. अशा परिस्थितीत शासनाने पुर्वीपासून नियोजनबद्ध काम करणाऱ्या पाटील यांची बदली करणे योग्य नव्हते, अशी भावना समाजमाध्यमातून नागरीक देखील व्यक्त करू लागले आहेत.

चोरमारे यांचा एकेरी लढा
संक्रमित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना संपूर्ण उपविभागाचा कारभार सांभाळत उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे हे उपाययोजनांच्या बाबतीत एकेरी लढा देत आहेत. आज बुधवारी त्यांनी तहसीलदार, न.प. मुख्याधिकारी, शहर पोलीस निरीक्षक यांच्यासह हिंगोली शहराच्या परिस्थितीबाबत आढावा बैठक घेऊन विविध सुचना दिल्या. शिवाय नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

लॉकडाऊनबाबत व्यापाऱ्यांची मागणी
वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभुमीवर पुर्वीच शहरात लॉकडाऊन करणे अपेक्षित होते. परंतू, स्थानिक प्रशासनाकडून याबाबत गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. शेवटी शहरातील व्यापाऱ्यांनी निवेदन सादर करून शहरात काही दिवसांकरिता लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्याची मागणी केली आहे.

एसडीएम चोरमारे यांनी घेतली आढावा बैठक