हिंगोली जिल्ह्यात ३ रुग्णांची भर ; २ महिन्याच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात

1 min read

हिंगोली जिल्ह्यात ३ रुग्णांची भर ; २ महिन्याच्या चिमुकलीने केली कोरोनावर मात

जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या ३८७ वर

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: जिल्ह्यात सेनगाव शहरातील तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाल्याने जिल्ह्याची रुग्ण संख्या 387वर पोहचली आहे. विशेष बाब म्हणजे ५ जणांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. या ५ जणांमध्ये कळमनुरीच्या डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पीटलमधील उपचारासाठी दाखल केलेल्या २ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश आहे.
सेनगाव शहराच्या बसस्थानकासमोरील भागातील २७, २८ व २५ असे वय असलेल्या तीन युवकांना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोना झाला आहे. कळमनुरी तालुक्याच्या शेवाळा या गावातील २ महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाल्याने कळमनुरीच्या कोव्हिड हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या चिमुकलीने कोरोनावर मात केल्याने १८ जुलैला डिस्चार्ज देण्यात आला. यासोबतच हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील वसमतच्या शुक्रवारपेठ भागाचे रहिवासी असलेल्या २ तर सेनगाव तालुक्यातील वैतागवाडी येथील २ जणांनी देखील कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या ३८७ झाली असुन त्यापैकी २९९ रुग्ण बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. ८८ रुग्णांवर सध्या उपचार सुरु असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.