हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी 28 कोरोनाग्रस्त  रुग्ण

1 min read

हिंगोली जिल्ह्यात एकाच दिवशी 28 कोरोनाग्रस्त रुग्ण

बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली :कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात हिंगोली जिल्ह्याने जरी बाजी मारली असली तरी नवे रुग्ण आढळून येण्याच्या प्रमाणात देखील वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकाच दिवशी 28 रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.
हिंगोली जिल्ह्यात अद्याप पर्यंत 361 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यापैकी 287 रुग्ण बरे झाले आहेत. तर आज घडीला 74 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागातील एक इसम, औंढा तालुक्यातील अंजनवाडी येथील एक, सेनगाव येथील बसस्थानकासमोरील एक तर हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अकरा जणांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. यापैकी चार पुरुष पाच महिला यांच्यासह अकरा वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी देखील बाधित आहे. वसमत शहरातील सम्राट कॉलनी भागांमध्ये अनुक्रमे 12, 15 व सहा वर्षाच्या मुलाला बाधा झाली असून स्टेशन रोड भागातील 13 वर्षीय मुलगी देखील बाधित आढळून आली आहेत. या व्यतिरिक्त गणेश पेठ येथील एकास कोरोना बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हिंगोली तालुक्यातील देऊळगाव रामा येथे पाच जणांना बाधा झाली असून यामध्ये तेरा वर्षाची मुलगी व अकरा वर्षाचा मुलगा असल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त पहेनी येथे दोन तर माळधामणी येथे एक व जयपूर वाडी येथील एक रुग्ण बाधित असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. एकूण 28 रुग्णांपैकी तीन रुग्णांचा कुठलाही पूर्वइतिहास किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात नसल्याचे समोर आल्यामुळे प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद व सुरत येथून आलेल्या दहा जणांना बाधा झालेली असून या व्यतिरिक्त पंधरा जणांना झालेली बाधा ही कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे झाल्याचे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.