हिंगोलीत कडक मुख्याधिकाऱ्यांची धडक मोहीम

1 min read

हिंगोलीत कडक मुख्याधिकाऱ्यांची धडक मोहीम

तब्बल चाळीस वर्षांनी घेतला रस्त्यांनी मोकळा श्वास

हिंगोली- शहरामध्ये रस्ते विकास योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. परंतु प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे तब्बल 40 वर्षांपासून रस्त्यावर असलेले अतिक्रमण कुठलीही अडचण न येता काढून रस्ते करण्यात आले.यामुळे शहराचे देखील रूप पालटले चित्र दिसून येत आहे.
हिंगोली शहरातील सर्व मुख्य रस्ते आणि उप रस्त्यांवर गेल्या 30 ते 40 वर्षांपासून नागरिक व व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. यामुळे रस्ते अरुंद झाले होते. परिणामी वाहतुकीस अडथळा देखील निर्माण होत होता. शहरांमध्ये भूमिगत गटार योजनेची कामे पूर्णत्वास पोहचली असून रस्ते विकास योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याची कामे धडाक्यात सुरू आहेत. हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांची प्रतिमा एक धडाकेबाज अधिकारी म्हणून जनसामान्यात पूर्वीपासूनच रुजलेली आहे. शिवाय नगर परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी देखील पाटील यांना विकास कामांसाठी पाठिंबा देऊन प्रोत्साहन दिले.
शहरातील गांधी चौक, जवाहर रोड, रामलीला मैदान लगतचा रस्ता, न्यू प्लॉट लाईन मागील रस्ता, जिल्हा न्यायालय समोरचा रस्ता, पलटण भागातील पीपल्स बँक ते जीवन प्राधिकरण दरम्यानचा रस्ता यावर असलेले अतिक्रमण हटवून रस्त्यांचे रुंदीकरण करीत सिमेंटी करण करण्याचे काम पूर्णत्वास पोहोचले आहे. विशेष बाब म्हणजे रिसाला बाजार भागात असणाऱ्या ईदगाह मैदानाजवळील रस्ता मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे अरुंद झाला होता. सदर रस्ता मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून रात्रीतून पूर्ण करून घेतला. याचबरोबर पिपल बँक जीवन प्राधिकरण दरम्यानच्या जवळपास चाळीस फूट रुंदीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. या ठिकाणी केवळ 10 ते 12 फूट रस्ता शिल्लक होता. सदर रस्त्याच्या संदर्भातील न्यायालयीन लढाई पार करून अतिक्रमण मोडीत काढत रस्त्याचे काम सुरू झाले आहे. लॉक डाउन पूर्वीज्या व्यक्तींनी हिंगोली बघितले असेल त्यांनी आज शहराचा आढावा घेतला तर संपूर्ण रूप पालटल्याचे दिसून येईल. शहरातील रुंद सिमेंटचे रस्ते व सुरळीत वाहतुकीमुळे नागरिकांमधून देखील नगरपरिषद प्रशासनाचे कौतुक होत आहे.
कडक मुख्याधिकाऱ्यांची धडक मोहीम
नियमांच्या बाबतीत काटेकोर राहून नेहमीच कडक भूमिका घेणाऱ्या नगर परिषद मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या धडक मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांना मध्ये धास्ती भरली आहे. प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण हटवताना स्वतः मुख्याधिकारी उपस्थित राहून काम करीत असल्याने रस्ता रुंदीकरणाची कामे शक्य झाली. भविष्यात रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण केले तर संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणार असल्याचा इशारा देखील रामदास पाटील यांनी दिला आहे.