हिंगोलीतील महसूलच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह

1 min read

हिंगोलीतील महसूलच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकारी पॉझिटिव्ह

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार महसूल विभागातील एक उच्चपदस्थ अधिकारी कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील एक वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यासह एक आरोग्य परिचारिका व परिचारक असे बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनातील उच्चपदस्थ पदाधिकारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ कोरोनाचा आता महसूल विभागात शिरकाव झाला आहे. महसूल विभागातील एका अधिकाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सदर अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या इतर सतरा अधिकाऱ्यांचा अहवाल येणे प्रलंबित असून. दोन दिवसांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या आईला कोरोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ आज झालेल्या अहवालानुसार सदर वैद्यकीय अधिकारी व त्याची पत्नी देखील कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. महसूल प्रशासनासह आता आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील विषाणूची बाधा होत असल्याचे निदर्शनास येत आहे.