हिंगोलीच्या कडक अधिका-याची धडक मोहिमेमुळे बदली

1 min read

हिंगोलीच्या कडक अधिका-याची धडक मोहिमेमुळे बदली

कर्तव्यदक्ष अधिकार्‍याच्या बदलीमुळे हिंगोलीकरांमध्ये संताप

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली- नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी रामदास पाटील यांची सोमवारी अचानक बदली झाली. त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त होताच सोशल मीडिया व निवेदनाच्या माध्यमातून हिंगोलीकरांनी तीव्र संताप व्यक्त करीत रामदास पाटील यांची बदली रद्द करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रामदास पाटील यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह संपूर्ण नगरसेवकांना विश्वासात घेऊन हिंगोली शहराची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काळात झालेल्या भूमिगत गटार योजनेसह रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे शहराला नवे रूप प्राप्त झाले आहे. शहरातील वृक्षलागवड असो कोरोना काळामध्ये गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी रामदास पाटील यांनी घेतलेला पुढाकार हा निश्चितच कौतुकाचा विषय ठरला. जवळपास तीन हजार गोरगरीब जनतेला अन्नधान्याची मदत करून देखील रामदास पाटील यांनी स्वतःची प्रसिद्धी जाणीवपूर्वक टाळली. WhatsApp-Image-2020-07-07-at-1.24.07-PM
शहरातील गेल्या 40 वर्षांपासून विविध रस्त्यांवर झालेले अतिक्रमण केवळ रामदास पाटील यांच्यामुळेच हटविणे शक्य झाले. त्यामुळे शहरात प्रशस्त सिमेंटचे रस्ते वाहतुकीसाठी लाभदायक ठरत आहेत. सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश उशिरा प्राप्त झाल्यानंतर सोशल मीडियातून मोठ्याप्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. नागरिकांनी अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करू नये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रद्युम्न गिरीकर, योगेश पाटील, महिंद्र पुरी, विजय पाटील, ज्ञानेश्वर लोंढे, गजानन लोंढे, नारायण घ्यार, हरपाल शेटी, चंद्रकांत वैद्य, संजय घवाड, रमेश वाबळे, संजय कुलकर्णी, सुनील पाठक, विजय गुंडेकर, कपिल सावळे यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करीत हिंगोली करांच्या जनभावनेचा आदर करीत रामदास पाटील यांची बदली तात्काळ रद्द करावी अशी मागणी केली. विराट राष्ट्रीय लोकमंचच्या वतीने देखील बदली रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
व्यापारी महासंघाच्या वतीने रमेशचन्द्र बगडिया, सुनील मानका, श्यामसुंदर मुंदडा, अशोक बसटवार यांच्यासह व्यापारी मंडळींनी देखील श्री पाटील यांची बदली रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले.WhatsApp-Image-2020-07-07-at-1.24.28-PM