हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांनी घातले नवीन निर्बंध

1 min read

हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांनी घातले नवीन निर्बंध

ई-पासला मर्यादा तर सोमवारपासून बँकेतील विड्रॉल बंद

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली : जिल्हामध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज दोन नवीन आदेश जारी करीत अनेक निर्बंध घातले आहेत. ज्यामध्ये वैद्यकीय कारणामुळे इतर जिल्ह्यात जाण्याकरिता कोणालाही ई-पास मिळणार नाही तर सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व बँकांमधील पैसे काढण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे.

हिंगोली शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. विशेष बाब म्हणजे ई-पासच्या नावाखाली किरकोळ करणावरून जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची व येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन यापुढे केवळ वैद्यकीय कारणासाठी किंवा अपरिहार्य कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याकरिता ई- पास दिला जाणार आहे. याकरिता संबंधित व्यक्तीला प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून प्रमाणपत्र घेणे अनिवार्य राहणार आहे. त्यानंतर गरज लक्षात घेऊनच ई-पास देण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले आहेत.

covid19.mhpolice.in_

याच बरोबर विविध बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. ही गर्दी टाळण्याच्या उद्देशाने व विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता सोमवार दिनांक 27 जुलै पासून जिल्ह्यातील सर्व बँकांमधील पैसे काढण्याची सुविधा बंद करण्यात येणार आहे. याला पर्याय म्हणून संबंधित बँकांचे व्यवसायिक प्रतिनिधी किंवा बँकांच्या ग्राहक सुविधा केंद्र मधून नागरिकांना पैसे काढता येतील. परंतु या करिता प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने लागू केलेले विविध नियम पाळणे गरजेचे असेल. ज्या गावांमध्ये ही सुविधा नाही अशा गावांच्या पालक बँकांनी सदर गावांमध्ये रक्कम वाटप करण्याच्या अनुषंगाने नियोजन करावे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती तथा ग्रामपंचायतशी पत्रव्यवहार करून रक्कम वाटप करण्याचे वेळापत्रक ठरवावे. त्यानंतर ग्रामसेवकाने ज्या नागरिकांना बँकेतून रक्कम काढावयाची आहे, अशांची स्लिप भरून बँकेने निर्धारित केलेल्या दिवशी बँकेत जमा करावी व रक्कम काढून पोलीस कर्मचाऱ्यांसह गावात उपस्थित होऊन नागरिकांची ओळख पटवून रक्कम वाटप करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ही प्रक्रिया अतिशय किचकट ठरणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करण्याची वेळ येऊ शकते.