सुमित दंडुके/औरंगाबाद: सध्या सगळीकडे औरंगाबादच्या नावावरून राजकारण चालू असल्याचं दिसत आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. औरंगाबादच नाव संभाजीनगर होईल तेव्हा होईल पण या नावांचा इतिहास मात्र अनेक लोकांना माहित नाही. हाच इतिहास आपण 'एनालायझर' च्या माध्यमातून पाहूया...
मोगल बादशहा औरंगजेब याच्या नावावरून या शहराला औरंगाबाद हे नाव पडले. मात्र त्यापूर्वीही या शहराची अनेक नावे होती. सर्वात जुन्या 'राजतडाग' या नावासाठी कान्हेरीच्या एका शिलालेखाचा संदर्भ दिला जातो. अहमदनगरच्या निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने इ.स.१६१० नंतर चारही बाजूंनी डोंगराने वेढलेल्या या भूभागावर खापरी नळांनी पाणी आणून शहर वसवले. त्यावेळी या भागाला 'खडकी' म्हटले जात होते.
'देवगिरीचे कटक' म्हणजे सैन्य आणि वस्तीची जागा म्हणून हा भाग वापरला जाऊ लागला. त्या 'कटक'चा अपभ्रंश पुढे कटकी, खडकी असा रूढ झाल्याचं सांगितले जाते. मलिक अंबरचा मुलगा फतेह खान याने खडकीचे नाव बदलून 'फतेहनगर' केले.
१६३६ मध्ये शहाजहान बादशहाने शहजादा औरंगजेबाची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली. तेव्हापासून अगदी इ. स. १७०७ साली त्याच्या मृत्यूपर्यंत औरंगजेबाचा या शहराशी संपर्क येत राहिला. या काळात या शहराला 'खुजीस्ता बुनियाद' असेही म्हटले जात असल्याचा उल्लेख कागदपत्रांत आढळतो. आजही 'किले अर्क' हा औरंगजेबाचा राजवाडा शहरात भग्नावस्थेत उभा आहे.
हिंदवी स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे नाव या शहराला नको, असे म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८ मे १९८८ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील जाहीर सभेत या शहराचे नाव 'संभाजीनगर' करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून नामांतराचा मुद्दा वारंवार पुढे येत राहतो.