घरफोड्या करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी जेरबंद

1 min read

घरफोड्या करणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी जेरबंद

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रद्युम्न गिरीकर / हिंगोली : हिंगोली व नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी घरफोड्यांचे गुन्हे करणारी व गेल्या आठ वर्षापासून पोलिसांसाठी मोस्ट वॉन्टेड असणारी टोळी नांदेड येथून जेरबंद करण्यामध्ये हिंगोली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे.
४ ऑक्टोबर रोजी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या वरुड तांडा येथे घरफोडी झाली होती. या गुन्ह्याचा तपास करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी तात्काळ तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक नेमण्यात आले. या पथकाने गेल्या वीस दिवसांमध्ये टोळीचा मागोवा घेत तपास केला. नांदेड येथील हिंगोली गेट परिसरात असणाऱ्या रेल्वे पुलाच्या खाली असलेल्या पालावर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले तर त्यांचे इतर 5 साथीदार घटनास्थळावरून फरार झाले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गोविंद सूर्यवंशी (रा. सैलानी नगर नांदेड) , संतोष पुनकेवर (रा. पांडुरंग नगर नांदेड), राहुल खानजोडे (रा. हिंगोली नाका नांदेड), अनिल भोसले, राजू भोसले, शंकर उर्फ टिल्ल्या भोसले (रा. पूर्णा जिल्हा परभणी हल्ली मुक्काम हिंगोली गेट रेल्वे पुलाखाली नांदेड) यांना अटक करण्यात आली.
WhatsApp-Image-2020-10-23-at-3.18.11-PM-1
सदर आरोपींकडून पोलिसांनी घेतलेल्या माहितीनुसार त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील बाळापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोंडापूर, वरुड तांडा तर वसमत तालुक्यातील किनोळा, खांडेगाव, टाकळगाव, वसमत येथील शास्त्री नगर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. सदर आरोपींनी नांदेड जिल्ह्यात देखील अनेक घरफोडीचे गुन्हे केले असून ते पुढील चौकशीत उघड होतील असे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान सदर आरोपींकडून एका ऑटो सह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १० लाख ८१ हजार ६०० रुपये एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक कलासागर यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. सदर पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, संभाजी लेकुळे, बोके, विलास सोनवणे, विठ्ठल कोळेकर, कातकडे, सावळे, काळे, झाडे आदी पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.