सुमित दंडुके/औरंगाबाद : शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असतानाच मनपाच्या कोविड केअर सेंटरमधुन धक्कादायक घटना समोर येत आहेत. काही दिवसांपुर्वी पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरने रुग्ण महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर काल पॉलिटेक्नीक कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एका तरुणीला अंघोळ करत असताना कुणीतरी बघण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. या घटनांची चौकशी होत नाही तर आणखी एक धक्कादायक बाब एका रुग्ण महिलेने व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणली आहे.
चिकलठाणा भागात राहणाऱ्या राधा इंगळे या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना मेल्ट्रॉन कोविड सेंटर येथे उपचार घेण्यास सांगण्यात आले. त्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर येथे संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास गेल्या, तेथील डॉक्टरांनी बेड रिकामे नसल्याचे कारण देत त्यांना दाखल करून न घेता घरी होम आयसोलेट होण्याचा सल्ला दिला. मात्र छोटे घर, घरात मुले, शिवाय शुगर देखील असल्याने त्यांना घरी उपचार घेणे शक्य नव्हते. ही बाब त्यांनी डॉक्टरांना सांगितली आणि तेथेच उपचारासाठी दाखल करुन घेण्याची विनंती केली. सुमारे ३ ते ४ तास त्या डॉक्टरांकडे विनवणी करीत तेथेच थांबल्या. मात्र डॉक्टर त्यांना दाखल करून घेत नव्हते. शेवटी त्यांनी रात्री पाऊणे अकराच्या सुमारास खासदार डॉ.भागवत कराड यांना मदतीसाठी फोन लावला. कराड यांनी डॉक्टरांना विनंती केल्यानंतर त्यांना दाखल करण्यात आले.
त्यानंतर ती महिला रुग्णालयाच्या आत गेली आणि समोरचे दृश्य पाहून त्या महिलेच्या पायाखालची वाळू सरकली. त्या रुग्णालयामधील एक हॉल चक्क रिकाम्या बेडने भरलेला होता. त्या इतक्या वेळ डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल करून घेण्याची विनवणी करीत होत्या तेव्हा डॉक्टर बेड शिल्लक नसल्याचे सांगत होते. आणि आतमध्ये पुर्ण हॉल रिकाम्या बेडने भरलेला होता हे पाहुन त्यांचा राग अनावर झाला आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रुग्णालयातूनच व्हिडीओ बनविला आणि व्हायरल केला.