हॉटेल आजही बंद, खोल्या मात्र दहा हजार...

1 min read

हॉटेल आजही बंद, खोल्या मात्र दहा हजार...

स्मारकासारखे दिसत असल्यामुळे हॉटेल दा प्रोरा असे नाव या हॉटेलला देण्यात आले होते. प्रोरा म्हणजे झुडुपांचे मैदान किंवा निकामी असलेली जमीन.

जर्मनीच्या बाल्टिक समुद्राच्या रूगेन बेटावर एक हॉटेल आहे, जे 80 वर्षांपासून तसेच वीरान अवस्थेत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या हॉटेलमध्ये तब्बल दहा हजार खोल्या आहेत, परंतु त्याहूनही आश्चर्यकारक बाब म्हणजे आजपर्यंत या हॉटेलमध्ये कोणतेही अतिथी राहिले नाहीत.

१९३६ ते १९३९ दरम्यान हे हॉटेल बांधले गेले होते. त्यावेळी जर्मनीमध्ये हिटलर आणि त्याच्या नाझी सैन्याचे राज्य होते. ‘स्ट्रॉथ थ्रू जॉय’ प्रोग्राम अंतर्गत या हॉटेलची निर्मिती करण्यात आली होती. यासाठी सुमारे नऊ हजार कामगारांनी काम केले होते.

स्मारकासारखे दिसत असल्यामुळे हॉटेल दा प्रोरा असे नाव या हॉटेलला देण्यात आले होते. प्रोरा म्हणजे झुडुपांचे मैदान किंवा निकामी असलेली जमीन. तसे पाहिले तर हे हॉटेल वालुकामय समुद्राच्या किनारयापासून सुमारे १५० मीटर अंतरावर तयार केले गेले आहे.

आठ हाऊसिंग खंडामध्ये  या हॉटेलची विभागनी करण्यात आली आहे. ४.५ किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये पसरलेल्या या हॉटेलमध्ये सिनेमा हॉल, समारंभ हॉल आणि स्विमिंग पूलही होता. याशिवाय सर्वात विशेष बाब म्हणजे येथे क्रूझ जहाज देखील उभे राहू शकत होते.

याचे काम पूर्ण झालेही नव्हते की, त्याआधीच १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले, त्यानंतर बांधकाम थांबले आणि सर्व कामगारांना हिटलरच्या युद्ध कारखान्यात काम करण्यासाठी पाठविण्यात आले. १९४५ मध्ये युद्धाचा अंत झाला पण या हॉटेलवर नंतर कधीच कुणाचे लक्ष गेले नाही.