...हम नही सुधरेंगे !

1 min read

...हम नही सुधरेंगे !

संचारबंदी शिथिल होताच खरेदीसाठी हिंगोलीतील नागरिकांची झुंबड. नागरिकांनी नियम पाळण्याची गरज

हिंगोली- प्रद्युम्न गिरीकर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हिंगोली शहरामध्ये देखील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पाच ते दहा जुलै दरम्यान शहरात संचारबंदी लागू केली होती. परंतु आज संचारबंदी शिथील होताच नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करीत हम नही सुधरेंगे याचा प्रत्यय दिला.
गेल्या काही दिवसांमध्ये हिंगोली शहरातील विविध भागांमध्ये कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. रिसाला बाजार, तलाब कट्टा, भोईपुरा, पेन्शन पुरा, आझम कॉलनी आदी भागांमध्ये संसर्ग झालेले रुग्ण समोर आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. विशेष बाब म्हणजे काही रुग्णांची ट्रॅव्हल हिस्टरी नसतानादेखील ते बाधित असल्याचे समोर आले आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असून शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी शारीरिक अंतर पाळण्यासह मास्क वापरणे बंधनकारक करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर नगरपरिषदेच्या वतीने यासंदर्भात काही दिवस दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. परंतु नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे समोर येत आहे. अखेर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पाच जुलै येथे दहा जुलै दरम्यान हिंगोली शहरामध्ये संचारबंदी लागू केली होती. जेणेकरून नागरिकांना संसर्गाचे गांभीर्य लक्षात यावे व होत असलेला प्रसार थांबावा हा उद्देश होता. जिल्ह्यात आज पर्यंत 328 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 272 जणांवर यशस्वी उपचार करून त्यांना सोडण्यात आले असून सध्या 56 जणांवर उपचार सुरु आहेत. परंतु आज शनिवारी संचारबंदी शिथिल होताच नागरिकांनी रामलीला मैदान, रेल्वे स्थानक जवळचा परिसर, जिल्हा परिषद मैदान याठिकाणी भरणाऱ्या भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अनेक नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क देखील बांधलेले नव्हते. एका बाजूने प्रशासन संसर्ग थांबविण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत असताना नागरिकांनी या प्रयत्नांना हरताळ फासून हम नही सुधरेंगे...! याचा प्रत्यय दिला आहे. त्यामुळे हिंगोलीकरांवर केवळ कायदा आणि कारवाईचा बडगा चालतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.