नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या बैटकीत संभाजी राजे यांनी व्यासपीठावर ठेवलेल्या खुर्चीवर न बसता समन्वयकांसह खालीच बसणे पसंत केले. आपण राजे घराण्याच्या सन्मान राखलात, आमच्यासाठी दोन मोठ्या खुर्च्या ठेवल्या. पण मी त्यावर बसणार नाही. मी माझ्या समाजा सोबतच खाली बसणार, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यानंतर संभाजीराजे यांनी आयोजकांना आपल्याला अशाप्रकारे वेगळी वागणूक देऊ नये, अशी विनंतीही केली. मी इथे येतोय म्हणजे मी समाजाचा घटक म्हणून येतो. ज्यावेळी मानपान घ्यायच्या त्यावेळी पुढाऱ्यांकडून आम्ही तो बरोबर घेतो. माझी सुद्धा खुर्ची समाजाच्या बरोबर हवी, समाजाच्या वर नको, असे संभाजीराजे यांनी म्हटले.
राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भातील संभाजीराजेंनी एक किस्सा सांगितला. शाहू महाराज मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी शाहू महाराजांनी आपल्या भाषणात मी तुमचा सेवक असल्याचे सांगितले. मी छत्रपती घराण्यातील राजे जरी असलो तरी, मी समाजाचा सेवक असल्याचे सांगत राजर्षी शाहू महाराज खाली बसल्याची आठवण संभाजीराजे यांनी सांगितले.