अवैध दारू विक्रीचे पितळ उघडे, पन्नास हजाराचा अवैध दारूसाठा जप्त

1 min read

अवैध दारू विक्रीचे पितळ उघडे, पन्नास हजाराचा अवैध दारूसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परभणी येथील विशेष पथकाने औंढा नागनाथ व हिंगोली नजीक असणाऱ्या दिग्रस कराळे येथे छापे टाकून देशी-विदेशी अवैध दारूचा तब्बल 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली.

हिंगोली/प्रदुम्न गिरीकर : जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस अंतर्गत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचा बिनबोभाट व्यवसाय सुरू आहे. दरम्यान 20 ऑक्टोबर मंगळवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परभणी येथील विशेष पथकाने औंढा नागनाथ व हिंगोली नजीक असणाऱ्या दिग्रस कराळे येथे छापे टाकून देशी-विदेशी अवैध दारूचा तब्बल 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली. या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.

हिंगोली पोलीस अधीक्षक म्हणून राकेश कलासागर नव्याने नियुक्त झाले आहेत. पदभार घेताच कलासागर यांनी जिल्ह्यात कुठलेही अवैद्य धंदे खपून घेणार नाही असा इशारा दिला होता. परंतु स्थानिक पातळीवरचे ठाणेदार अवैद्य व्यवसायिकांशी हातमिळवणी करून अवैध दारू विक्रीचा कारभार बिनबोभाट सुरू ठेवत आहेत. हा कारभार आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मारलेल्या धाडीमध्ये उघड झाला. औंढा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या साळणा व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या दिग्रस कराळे येथे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अचानक धडक मारून देशी-विदेशी दारूचा 50 हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये एकूण  चार आरोपींना  अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक जी. एल. पुसे यांच्या सह कर्मचारी किशोर काळे, विजय टेकाळे, सी.एल. दहिफळे यांनी सहभाग नोंदविला.