सिद्धेश्वर गिरी / सोनपेठ : मागील अनेक दिवसांपासून सोनपेठ शहरात व तालुक्यात अवैध धंद्यात वाढ झाली असून काही दिवसांपूर्वी पदभार घेतलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने यांनी सुरुवातीला केलेल्या कडक कारवाईमुळे सोनपेठमध्ये कायदा व सुव्यवस्था चांगली राहीली. मात्र आता स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच सोनपेठमध्ये मटका,जुगार, यासह चोऱ्या, मारामाऱ्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी निर्माण झाली आहे. याला सोनपेठ पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा होत आहे.
यामुळे सोनपेठ पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यात काही बिट अमलदारांनी तर वसुलीसाठी खाजगी व्यक्ती नेमल्याची चर्चाही होत असून. सोनपेठ पोलिसांचा हा प्रकार गुन्हेगारी वाढवण्याचा आहे. की गुन्हेगारीकरण संपवण्याचा असा सवाल उपस्थित होत आहे. ग्रामीण भागात तर देशी, विदेशी दारुसह, हातभट्टी विक्री मोठ्या प्रमाणात चालू असल्याने गुन्हेगारी बोकाळली आहे. यात सायखेडा कारखाना, खडका आदींसह ग्रामीण भागात दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालू असते. यामुळे अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवण्याचा विडा उचललेला असतानाच सोनपेठचे पोलीस मात्र जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या आदेशाला हरताळ फासत असल्यानेच सोनपेठमध्ये नेहमी परभणी येथील गुन्हे अन्वेषण पोलिस पथकासह पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरीही सोनपेठ पोलिस मूग गिळून गप्प बसल्याचे दिसत आहे. दरम्यान सोमवार दि.४ जानेवारी रोजी गुन्हे अन्वेषण पथकाच्या टीमने दोन मटका खेळणा-या आरोपींवर कारवाई करत त्यांच्याकडून रोख रक्कमेसह ८७,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे देण्यात आली. सदर कारवाई पीएसआय विश्वास खोले, पीएसआय चंद्रकांत पवार, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, शंकर गायकवाड,अरुण कांबळे आदींनी केली आहे.