निमगावात दोघांना बुडताना  वाचवायला जाणा-या मामासह तिघांचा बुडुन अंत.

1 min read

निमगावात दोघांना बुडताना वाचवायला जाणा-या मामासह तिघांचा बुडुन अंत.

जिल्ह्यात हळहळ व्यक्त.

सिद्धेश्वर गिरी/परभणी: दसऱ्याच्या निमित्ताने घरातील कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले व त्यांना वाचवणाऱ्या मामाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथे वाण नदीतील डोहात १६ ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहीती अशी की, दसऱ्याच्या निमित्ताने घरातील कपडे धुण्यासाठी सचिन संभाजी बोडखे त्यांच्या आई सोबत बहिणीकडे निमगाव येथे आले होते. तेव्हा त्यांची बहीण आणि आई धुतलेले कपडे वाळवण्यासाठी नदीकाठच्या बाजूला गेल्या असता सातवर्षीय सचिन सुरेश मुळे हा छोटा मुलगा नदीपात्रात अचानक पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याची बहीण शिवकण्या सुरेश मुळे (वय १५) हिने पाण्यात उडी मारली. मात्र त्यांना पोहता येत नसल्यामुळे ते दोघेही बुडत असल्याचे पाहून नदी शेजारीच असणारा त्यांचा मामा सचिन संभाजी बोडखे (वय २०, रा.सोनपेठ) याने पाण्यात उडी घेतली.परंतू भाच्यांना काढण्यात मामालाही अपयश आल्याने तिघांचाही मृत्यू झाला.
WhatsApp-Image-2020-10-16-at-6.26.09-PM
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी कठोर परिश्रम घेऊन या तीनही बालकांच्या मृतदेह शोधात कठोर सूचना दिल्या होत्या. परिसरातील मासेमारी करणाऱ्या भोई लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले सदर घटनास्थळावर बघ्यांनी गर्दी केली होती.घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण सोनपेठ शहरावर शोककळा पसरली आहे.तसेच ऐन सणासुदीच्या तोंडाला दोन सख्ख्या भावंडांसह त्यांच्या मामाचा मृत्यू झाल्यामुळे निमगाव येथे देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.