पुणे : कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली .
अजित पवार म्हणाले, पुढील आठ दिवसात शहरातील रुग्णसंख्या कमी झाली नाही तर नाईलाजास्तव पुढच्या शुक्रवारी (२ एप्रिल) लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, कितीही इच्छा नसली तरी येत्या पाच सहा दिवसात अशीच रुग्णवाढ होत राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही. आज झालेल्या बैठकीत अनेकांचे, खासकरून वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे असे मत होते की कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन करावा लागेल. येत्या पाच सहा दिवसात काय होते त्यावर ठरेल. त्यामुळे पुढचे आठ दिवस पुणेकरांसाठी महत्त्वाचे असल्याचही अजित पवार यांनी सुचित केले आहे.
