हरी मुखे म्हणा

रामकृष्णहरी हा षडाक्षरी मंत्र वारकरी संप्रदायाचा संजीवनी मंत्रच ठरत आहे. भक्तीमार्गात अवडंबराची गरज नाही तर शुद्ध अंत:करणाने त्याचे स्मरणदेखील केले तर ते पुरेसे आहे.

हरी मुखे म्हणा

महाराष्ट्रः हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ।पुण्याची गणना कोण करी ।।
देवाचिये द्वारी उभा क्षण भरी। तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।।

हरिपाठाच्या अभंगातील ईश्वराच्या समीप जाण्याचा हा सहज सुलभ मार्ग सगळ्यांनीच सांगितला आहे. रामकृष्णहरी हा षडाक्षरी मंत्र वारकरी संप्रदायाचा संजीवनी मंत्रच ठरत आहे. भक्तीमार्गात अवडंबराची गरज नाही तर शुद्ध अंत:करणाने त्याचे स्मरणदेखील केले तर ते पुरेसे आहे. मनातून एकदा त्याला हाक मारा! मग बघा तो कसा धावतपळत येतो आपली हाक ऐकून. त्याची गरज असल्यासारखा.

गोरोबा काकांनी कुठे कर्मकांडाची भक्ती केली. ते फक्त पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग होते. विठ्ठल हा श्वास होता. विठ्ठल हा ध्यास होता. तो आणि तोच केवळ विचार होता. आलाच ना धावत तो गोरोबा काकासाठी. काकांनी एकदा आवा लावला. आव्यात नजर चुकवून मांजराचे पिलू घुसले. काकांनी न पाहताच आव बंद करुन पेटवला आणि त्या आव्याभोवती मांजर आपल्या पिलाच्या चिंतेने फिरु लागली. काकांनी ते पाहिले आणि लगेच ताडले; पण तोपर्यंत आव्याने चांगलाच पेट घेतला होता. काका डोळे मिटून पांडुरंगाचा धावा करु लागले! म्हणाले देवा, हे मांजरीचे पिलू माझ्या चुकीमेळे अडकले आहे. या पेटलेल्या आव्यात ते जळाले तर मी आयुष्यभर हे काम करणार नाही. ही प्रतिज्ञा करुन काका त्याच्या नामस्मरणात दंग झाले आणि काय आश्चर्य! आवा फोडल्यावर पिलू जिवंत बाहेर आले. विठ्ठलालाच काळजी. या कथेतील चमत्कार किती खरा या वादात आपल्याला पडायचे नाही. एवढे समजले की नामस्मरणात शक्ती असते तरी पुरे. काकांची आपल्या पांडुरंगाविषयीची भक्ती खरी होती, ती आतून होती म्हणूनच ते संकटातून तरले.


काही लोक म्हणतील की, आम्हीही नामस्मरण करु शक्य आहे का असा चमत्कार! आता होणे असेल तर सांगा. सांगा तुमच्या देवाला की, आता असा चमत्कार करुन दाखव म्हणावं; पण 'मुंह मे राम आणि बगल मे छुरी' असे नामस्मरण काय कामाचे. मन शुद्ध नाही. मनात वाईट विचार आणि मुखात हरिनाम असे कसे चालेल. अशा भोंदूना ना हरी दिसतो, ना तो कळतो.
आणि देवा मी तुझे नाव घेतो, तुझी पूजा करतो. तू माझी एखादी इच्छा पूर्ण कर, असे म्हणायला भक्त काय सौदा आहे काय तो व्यापार असेल तर मन आणि भाव त्याच्या विनिमयावरच चालतो याचा सोयिस्कर विसर आपल्याला पडतो.
एक गाणे फार प्रसिद्ध आहे.
मी विकत घेतला श्याम
नाही खर्चीली कवडी दमडी
नाही वेचिला घाम...
जन्मभरीच्या श्वासाइतके
मोजियले हरिनाम...

या व्यवहारात त्या सावळ्याला गुलाम करता येते; पण पैसा, द्रव्य देऊन हे करता येत नाही तर जन्मभराच्या श्वासाइतके हरिनाम मोजावे लागतात. याचाच अर्थ असा की प्रत्येक श्वासात तो असावा लागतो, तो आपले प्राण तत्व बनला पाहिजे.

वारी आता पंढरीच्या समीप पोहोचत आली आहे. साधू-संतांच्या संगतीत आपल्याला ज्ञान प्राप्ती होऊ लागली आहे. आता त्या नाममहात्म्याकडे आपले लक्ष गेले पाहिजे.
जेयाचिये वाचे माझे आलाप ।
दिठी भोगी माझेची रुप ।
जेयाचे मन संकल्प । माझेची वाहे ।।

अशी अवस्था येणे आवश्यक असते. केवळ मुखातून हरिनाम चालू आहे, असे म्हणून भागत नाही तर त्यासोबतच आपल्या मनातही तो हरी असला पाहिजे. नामस्मरण या शब्दात नामासोबत स्मरण हा शब्ददेखील येतो. त्याच्या स्मरणासहित नाम घेऊन लागलो की मग बस ते कुठे घ्यावे, कधी घ्यावे, त्याला काही वेळ काळ आहे का. या सल्या प्रश्नांत गुंतून न पडता ते मनातून घ्यावे एवढेच लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याचे नाव कधीही, कुठेही घ्यावे पण त्याच्या मंगल, पवित्र आस्तित्वाचे स्मरण असावे. ते असले की, मग आपली प्रत्येक कृती चांगलीच होत राहते. किंबहूना आपल्या वाईट कृतीवर नियंत्रण राहते. माझ्या सगळ्याच कृती त्याला अर्पण करायच्या असतील आणि त्या माझ्या पांडुरंगाला मिळणार असतील तर मग कृती चांगली असली पाहिजे याचे भान आपोआप येते.
जरा हा कान्होपात्रेचा अभंग पहा ना-
देव भक्ताचा अभिमानी ।
वाहि चिंता सकळ मनी ।
देव भावाचा भुकेला ।
कान्होपात्रे आनंद झाला ।

नाव आणि नावासोबत मनातला भाव असला की त्याची प्राप्ती होते. अगदी सहज होते. मन हाच भाव इंग्रजी मनीचा (पैसा) आला की मात्र सगळे मुसळ केरात जाते.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.