आयपीएलवर सट्टा लावणार्‍यांकडून  अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त.

1 min read

आयपीएलवर सट्टा लावणार्‍यांकडून अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त.

पूर्णा पोलिसांची कारवाई तिघांना अटक

विजय कुलकर्णी/परभणी : पूर्णा शहरातील महावीर चौकातील एका दुकानाच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत मंगळवारी दि. 10 रोजी आयपीएल क्रिकेटवर सुरू असलेल्या सट्टाजुगारावर पूर्णा पोलिसांनी धाड टाकून एक लाख 18 हजार 860 रुपयांसह एकूण दोन लाख 27 हजार 130 रुपयांचा ऐवज जप्त केला.
पूर्णा कमल टॉकीजजवळील येथील महावीर चौकातील एका साडी सेंटरच्या वरच्या पहिल्या मजल्यावर आयपीएल क्रिकेट मॅच मुंबई इंडियन्स विरूध्द दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील फायनल सामन्यावर लोकांकडून पैसे घेऊन हार-जीतवर आयपीएल क्रिकेटवर पैसे घेऊन सट्टा लावल्या जात असल्याची माहिती पूर्णा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पूर्णा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ, फौजदार मारकवाड, फौजदार श्री.गुट्टे, कर्मचारी रत्ने, वसिम, गिरीन चन्नावार, वाघ, समीर पठाण, महिला पोलिस कर्मचारी सय्यद रफत आदींच्या पथकाने मंगळवारी रात्री आठच्या सुमारास आयपीएलवर सट्टा सुरू असल्याच्या ठिकाणी धाड टाकली.
त्यावेळी तेथे अमोल उर्फ सचिन रामराव वाघमारे, कृष्णा राजाराम ओझा, रामप्रकाश श्रीनिवास धुत, मनमोहन उर्फ गोलू विजयप्रकाश धुत (सर्व रा. पूर्णा) हे आयपीएलच्या फायनल मॅचवर पैसे घेऊन सट्टा लावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पथकातील अधिकारी - कर्मचार्‍यांनी तेथील तिघांना ताब्यात घेत एक लाख 18 हजार 860 नगदी रुपयांसह सट्टा जुगारासाठी वापरण्यात येत असलेले सर्व साहित्य ज्यात एक संगणक, कॅल्क्युलेटर, डीजीटल केबल रिसिव्हरसह सट्टा तब्बल 11 मोबाईल असा एकूण दोन लाख 57 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास फौजदार गुट्टे हे करीत आहेत.