...जब प्यार किया तो 'शर्मा'ना क्या...?

यार हमारी बात सुनो, ऐसा इक इंसान चुनो... जिसने पाप ना किया हो, जो पापी ना हो...

...जब प्यार किया तो 'शर्मा'ना क्या...?

काही वेळा दोन घटनांची तुलना होऊ शकत नाही. पण घटनेच्या अनुषंगाने संदर्भ मात्र द्यावेसे वाटतात. संदर्भ चूक की बरोबर? तुलना करावी की नाही? तुलना किंवा संदर्भ योग्य की अयोग्य? असे प्रश्न नक्कीच पडतात. पण असो, द्यायला तर हवेतच...

एक घटना आहे १९९७ सालची. महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देताना अण्णा हजारे या सद्ग्रहस्थाने दिवंगत लोक नेते गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप करून धमाल केली. आपल्याला पुरलेली मडी उकरायची नाहीत, म्हणून त्याचा फार खोलात उल्लेख मी करणार नाही. तशी इच्छाही नाही. पण पुसटसा संदर्भ आवश्यक वाटतो.

घटना १९९७ ची. मनपाच्या सर्व्हे दरम्यान कर्मचाऱ्यांना मुंबईत कुठं तरी एका महिलेचा फ्लॅट आढळला व त्यावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नाव महिलेच्या नावामागे लिहिलेलं होतं. या प्रकाराचा अण्णा हजारे यांनी खुप मोठा बाऊ केला व प्रकरणाने खळबळ उडवून दिली. ह्या प्रकारामागे राजकारण नक्कीच होतं. मुंडे यांनी १९९१ ते १९९५ दरम्यान जी आक्रमक भूमिका घेऊन काँग्रेसला सत्तेतून बाहेर करण्यात मोठी भूमिका बजावली होती, त्याची किनार या प्रकरणाला होतीच. त्यात निष्पन्न काही झालं नाही. फक्त मुंडे यांची व्हायची अनाठायी बदनामी तेवढी झाली. दुखावलेल्या लोकांनी अण्णा हजारे यांना रसद पुरवलेली होती, हेही इथं लक्षात घ्यायला हवं. असो...

त्या प्रकरणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उघड भूमिका घेऊन गोपीनाथरावांना दिलासा व मानसिक बळ दिलं याचं कौतुक मला तरी आहे. शिवाजी पार्कवरील जाहीर सभेत बाळासाहेबांनी मुंडे यांची पाठराखण करताना 'जब प्यार किया तो डरना क्या...?' असं म्हटलं. पुढे गोपीनाथराव त्यातून निष्कलंक सिद्ध झाले. नेत्यांचं मनोबल खच्चीकरण व अस्तित्व संपवण्यात अशी प्रकरणं खुप मोठी मदत करतात.

संकटकाळी गोपीनाथराव व मुंडे परिवार त्यावेळी खंबीरपणे उभा राहिला. त्यावेळी ज्येष्ठ ठाकरे समर्थपणे गोपीनाथवांच्या पाठीशी उभे राहिले. आज पुन्हा एक मुंडे अर्थात धनंजय राजकीयदृष्ट्या अडचणीत आले/आणले गेले आहेत. त्यांच्या पाठीशी कनिष्ठ ठाकरे तितक्याच समर्थपणे उभे राहतील का? हा एक प्रश्नच आहे. त्यापेक्षा ठाकरे यांना धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे राहु दिलं जाईल का? हा खुप मोठा प्रश्न आहे.

बरं, अशा प्रकरणात कोण सुटलाय...? कोण आहे धुतल्या तांदळाचा...? कोण कसली माहिती लपवली व कोण छातीठोकपणे आपले सगळे विस्कटून सांगतो, ते अगदी स्पष्ट आपण पहात असतोच ना...!

आधी गोपीनाथराव मुंडे यांना राजकीयदृष्ट्या उदध्वस्त करण्याचं कारस्थान आणि नंतर पंकजा मुंडे यांना अनेक प्रकरणात बदनाम करण्याचं षडयंत्र आणि निवडणुकीत रसद पुरवून पराभूत करण्याचा डाव खेळला गेला. आता राज्याच्या राजकारणात प्रभावी ठरलेले धनंजय मुंडे हा आणखी एक ओबीसी नेता उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान. यामागे राजकारण नक्कीच आहे... ज्येष्ठ ठाकरे प्रमाणे कनिष्ठ ठाकरे समर्थपणे मुंडे यांच्या पाठीशी उभे राहतात की, सरकार टिकवण्यासाठी मौन धारण करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल...

एका मुलीने आरोप केला आणि धनंजय मुंडे यांनी ते आरोप नाकारले आहेत. मात्र, पीडित मुलीच्या बहिणीशी असलेलं नातं त्यांनी खुलेपणाने स्वीकारले आहेत. हे स्वीकारण्यासाठीही खुप मोठं धाडस, नैतिक मनोबळ लागतं आणि ते धनंजय यांनी दाखवलंय... राजकारणातील नेता किंवा कार्यकर्त्यांनी आपले चारित्र्य जपावे लागते. ते जपणारे अभावानेच सापडतात. धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाने लोकांना वाट्टेल ते बोलायची व लिहायची मुभा मिळाली आहे, म्हणून कुठल्याही पातळीवर लोक व्यक्त होत आहेत. जणू काही प्रभू रामचंद्रानंतर एकपत्नीव्रत व एकवचनी 'मी' एकटाच आहे, हा अविर्भाव दिसतो. त्यांचा तो परस्परसंमतीतून संबंध आला व पुढे चाराचे सहा-आठ झाले. बाकी कोणाचा काही संबंध नसताना लोकांना का मळमळतंय कोणास ठाऊक...

पण मित्रहो...

यार हमारी बात सुनो,
ऐसा इक इंसान चुनो...
जिसने पाप ना किया हो,
जो पापी ना हो...

कोई है चालाक आदमी,
कोई सीधा सादा...
हममें से हर एक है पापी,
थोड़ा कोई ज़्यादा...

आणि हो, आपण सगळे मिळून एक नक्की करू या. धनंजय मुंडे यांच्यावर दगड मारण्यापूर्वी
'लेकिन जो पापी न हो,
वो पहला पत्थर मारे...!'
एवढंच एक पथ्य पाळता येईल का....?

  • विजयकुमार स्वामी, लातूर
    9822732929

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.