जायकवाडीची खोली.. अन रावसाहेबांची बोली.

1 min read

जायकवाडीची खोली.. अन रावसाहेबांची बोली.

एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे हे होते. रावसाहेब या परीक्षेत त्यांच्या मुळ स्वभावाप्रमाणे बोलले. रावसाहेबांच्या रांगड्या आणि इरसाल भाषेपुढे माझाचे सहकारी जरा मंत्रमुग्ध झाले होते असेच दिसतेय. म्हणूनच सगळ्यापेक्षा अधिक गुण रावसाहेब दानवे यांना मिळाले.
रावसाहेबांनी त्यांच्या उत्तरात आपली भाषा रांगडी गावाकडची आणि अस्सल मातीमधली असल्याचे सांगितले. तसेच तेच ‘संस्कार’ आपल्या भाषेवर झाले असल्याचे ते बोलले. बोलून मी अडचणीत येतच नाही तर माध्यमे मला अडचणीत आणतात आणि ते देखील टीआरपी साठी असा आरोप करायला देखील ते विसरले नाहीत.
आपल्या भाषेच्या समर्थनार्थ रावसाहेब दानवे म्हणाले,
“नांदेडच्या एका राजकीय नेत्याने माझ्या भाषणावर केलेली कोटी पहा , ‘जायकवाडीची खोली आणि रावसाहेबांची बोली’ हिच मराठवाड्याची ओळख आहे.”
एबीपीच्या न्युजरूममध्ये त्यावेळी हशा आणि टाळ्या झाल्या. पण एक गोष्ट अगदी अनाहुतपणे रावसाहेब खरी बोलून गेले ते म्हणजे जायकवाडीची खोली आणि रावसाहेबांची बोली सारखी आहे. जायकवाडी धरण हे मातीचे आणि उथळ धरण आहे. ते खोल अजिबात नाही. तशीच रावसाहेबांची बोली उथळ आहे. त्यात विचारांची खोली अजिबात जाणवत नाही.
रावसाहेब मनोरंजनाच्या अंगाने बोलत असतात. आणि लोकरंजन करण्याची सवय असलेल्या लोककलावंताप्रमाणे ते विनोद करत जातात. रावसाहेब लोककलावंत नाहीत तर ते राजकारणी आहेत. याचा सोयीस्कर विसर त्यांना पडतो.
विस लाख मतदार असलेल्या मतदार संघाचे ते खासदार आहेत. जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या देशातील क्रमांक एकच्या पक्षाचे एका अकरा कोटीच्या राज्याचे अध्यक्ष आहेत.
रावसाहेबांची भाषण आणि त्यातील विसंगती वृत्तवाहिण्यांना टीआरपी मिळवून देतात हा रावसाहेबांचा समज असेल तर तो साफ चुकिचा आहे. विनोदाने टीआरपी मिळाला असता तर महाराष्ट्रातील सगळ्याच न्युजचॅनलनी रोज तासभर इंदूरीकरांची किर्तन ऐकवली असती.
ग्रामिण भाषा म्हणजे पांचटपणा, बेतालपणा असा समज रावसाहेब दानवे यांचा असेल तर त्यांना बहिणाबाईंच्या कविता, गाडगेबाबांची किर्तन ऐकवावी लागतील जी ग्रामिण गोडवा घेत आजही जनमानसावर गारूड करत आहेत.
मराठीतील अभिनेता मकरंद अनासपूरे जी भाषा चित्रपटात वापरतो ती मराठवाड्याची भाषा असल्याचे बोलले जाते. पण मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि कांही तालुक्यात वेगवेगळी भाषा बोलली जाते.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड तालुक्यात ‘जेवलास की? आलास की?’ असे की लावत बोलण्याची सवय आहे. पावने तुमी बसल्या की इत इत आमी बसल्या होत्या की असे बोलण्याची सवय आहे. हाच शब्द लातूर जिल्ह्यात गेलात तर जेवलाव का? आलाव? असा बोलला जातो.
भाऊ यंगा की लवकर गाडी धक्कल ना...
म्हणजे भाऊ चढा की लवकर गाडी निघेल ही भाषा मध्यमराठवाड्यातील एक समुदाय बोलतो.
अयी काय करूलालास.. यावं का लवकर.. नग मनुलालास.... अशी हेल लावत कर्नाटक सीमेवर असलेली मराठवाडी माणसं बोलतात
तर कुटाव.. काय करूलालाव.. यावं का लवकर अशी जराशी रगेल वाटणारी भाषा लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात बोलली जाते.
रावसाहेब ज्या भागाच्या खासदार आहेत त्या भागात.. बसेलय.. ( बसलेला आहे) येयेलय . ( आलेला आहे) साहेब चर जायेलय ( साहेब तर गेलेले आहेत ) असे बोलण्याची सवय आहे. याची उच्चार मोठी रंजक वाटतात.
त्यामुळे रावसाहेबांची भाषा मराठवाड्याची ओळख असूच शकत नाही. देऊन टाक हा शब्दच जालण्यात देऊन दे... तर लातूरला दे दे जाऊदे.. असा उच्चारला जातो. मग मराठवाड्याची भाषा ही रावसाहेबांची भाषा कशी असू शकेल.
रावसाहेबांची शब्द ग्रामिण नक्कीच असतील पण त्याचा रोख मात्र उध्दट अशा स्वरूपाचा असतो. ‘साले’ हा शब्द मराठवाड्यात नेहमी वापरला जातो हे मान्य. ‘साला तो ऐकतच नाही’ हा शब्द सर्रास वापरला जातो. पण हा शब्द अधिकार असलेला व्यक्ती वापरत असतो. रावसाहेब दानवे यांनी तरी रडतेत साले हा शब्द शेतकरी असो की कार्यकर्ता यांच्या साठी कोणत्या अधिकाराने वापरला हे तेच आता स्पष्ट करतील.
गोळी छातीवर नाही तर पायावर मारायला हवी होती.. हे त्यांचे वाक्य ग्रामिण भाषेतील नक्कीच नाही. आणि कोणाला गोळी मारली पाहिजे हे संस्कार भाषा अथवा परीसर नक्कीच करत नसतो.
निवडणुकात लक्ष्मी दर्शन करून घ्या घरी आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका.. पेसे सगळ्यांचे घ्या असे एका पक्षाच्या पदाधिका-याने म्हणणे कोणत्या संस्कारात बसते हे रावसाहेब दानवेच सांगू शकतील.
आपल्या गावरान असण्याविषयी रावसाहेब ठासून बोलत होते. आणि दर्शक आणि न्युज रूम मधल्या सगळ्यांचे मनोरंजन करत होते. पण “हाऊ मच” हा प्रश्न पडतोच. ग्रामिण आणि विनोदाच्या नावाखाली किती उध्दट आणि दर्प असलेले बोलायचे हा देखील प्रश्नच आहे.
मराठवाड्यात पाशा पटेल, सुरेश धस ही मंडळी ग्रामिण ढंगात बोलतात. पाशा पटेल शेतकरी वर्गासाठी काम करतात त्या अधिकारातून शेतकरी वर्गासाठी ते ग्रामिण शब्द वापरत असतात. सुरेश धस यांनी असा पांचटपणा केल्याचे ऐकिवात नाही. पण स्वतःला राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणारे रावसाहेब दानवे मात्र आपला अहंकार ग्राम्य भाषेच्या नावाखाली खपवतात.
रावसाहेबांची शब्द ग्रामिण नक्कीच असतील पण त्याचा रोख मात्र उध्दट अशा स्वरूपाचा असतो. पण एक गोष्ट अगदी अनाहुतपणे रावसाहेब खरी बोलून गेले ते म्हणजे जायकवाडीची खोली आणि रावसाहेबांची बोली सारखी आहे. जायकवाडी धरण हे मातीचे आणि उथळ धरण आहे. ते खोल अजिबात नाही. तशीच रावसाहेबांची बोली उथळ आहे. त्यात विचारांची खोली अजिबात जाणवत नाही.