जगू द्या तिला....

भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्या सोबत महिला अत्याचारावरील घटनासोबत बोलत असताना एका अस्वस्थ मनस्थितीत त्यांनी रात्री उशीरा कांही लिहून व्हाटसअप वर पाठवले. मला हाच लेख करावा वाटला आणि तोच आपल्यासाठी देत आहे. यावर राजकाररण विरहीत विचार व्हावा

जगू द्या तिला....

हिंगणघाट येथील तरुणीचा मृत्यू ...सुन्न आणि अशांत एकाच वेळी करणारा ठरला … हे चक्र येथेच थांबले नाही. घटना घडतच आहेत. कॉलेज, शाळा, नोकरी हे काही आज करत नाहीत मुली.. पण मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र आज इतका हीन का झाला? याचं कारण काय ?
"सरकार काय करतं, पोलीस काय करतात ?'' हे टिपिकल प्रश्न विचारत सर्वांनी रिऍक्ट केलंही. पण मला प्रश्न पडतोय आपण काय करतोय? या देशात धर्मांच्या दऱ्या होत्या त्या  आता जातीच्या महादऱ्या झाल्या आहेत.. स्त्री आणि पुरुष ही लढाई आहेच.  त्यापेक्षाही आता 'मुलाची आई' आणि 'मुलीची आई ' या दोन नवजाती मधील संघर्ष भावनिक आणि महत्वाचा वाटतो आहे .. 
आपल्याकडे मुलीची आई सातच्या आत घरात या काळजीत असते तर मुलाची आई निर्धास्त असते.. मुलीची आई पालन पोषण करताना तिला लपवायला शिकवते तिच्या मनात, तिच्या शरीरात होणाऱ्या बदलापासून तिच्यावर होणाऱ्या अत्याचारापर्यंत.. 
 तो अत्याचार जीवघेणा झाला की समाज रस्त्यावर येतो.. आपल्याच माणसाच्या अंगावर जातो आपल्याच देशाच्या मालमत्तेचं नुकसान करतो आणि विषय तिसरीकडेच जातो ..
पोलीस त्यांचं काम करतील, सरकार आणि न्यायालय आपलं करेल .. पण आपण आपलं काम कधी करणार? 
मुलीला मासिक धर्म आला की लपवायला लावणार... आणि मुलाला दाढी आली की शान वाटणार. तो रुबाबात फिरणार पुरुष झाल्याच्या. पण मुलीचे स्त्री होणे मात्र चिंताजनक?  
मुलाने घाण शिवी हासडली की वाघ ठरणार  ,मुलीने नुसता आवाज चढवला की राग येतो.. का ? ती चरित्रहीन ठरते?
एवढ्या घटना घडल्या पण अशी एकही आई समोर नाही आली जी म्हणेल की ' हा माझा मुलगा नराधम आहे, याला हत्तीच्या पायाखाली द्या!!'
आधी जनावर, दरोडेखोर यांचे भय असायचे तेही अंधारात, आता भर दिवसा हे पाशवी, निर्लज्ज, क्रूर जनावरं फिरतात यांचं काय ?डाकू तरी संपत्ती लुटतो पण हे अस्तित्व लुटतात! जिच्यावर अन्याय करतात तीचं आणि तिच्याकडे बघून थरकाप उडाला अशा व्यक्तींचं ही ..
मी ७ वी ८ वी मध्ये होते..अशीच घटना घडली होती. उल्हासनगरमध्ये एका मुलीला परीक्षेत हॉल मध्ये येऊन जाळलं होतं. एकतर्फी प्रेमातून!... किती घाबरले होते मी आणि आम्ही सर्व.
.. हे गुन्हेगार  केवळ घटना घडवून आणत नाहीत तर एक वातावरण तयार करतात, ते एक शरीर, एक मन जखमी करण्यासाठी नाही,तर असंख्य मनावर ओरखडे ओढण्यासाठी करतात! त्यांच्यातील सैतान हा एक सावज घेऊन अनेकाना जखमी करतो विकृती आहे.. बस!!
या सर्व गुन्ह्यामागे काय आहे तर प्रवृत्ती? नाही... नकार ऐकण्याची तयारी नसणारी विकृत, अहंकारी वृत्ती ..
मुलीनी नाही म्हटले तर अपमान! असं आपण समजतो, 'अरे काय बायकासारखा रडतो?' असं संवेदनशील माणसाला हिणावले जाते. बांगडया भरल्यात का?' अशी चिथावणारी भाषा ..चव पण अशी 'मुन्नी बदनाम' , 'मै चीज बडी हू मस्त' हे गाणे...
पण त्या लोकांना ज्यांना पैसा ,सत्ता किंवा अगदी पुरुष म्हणून जन्माला आला याचा माज त्यांचं काय ??
एखाद्या ठिकाणी पुरुष आणि स्त्री दोघेही चूक असले तरी चर्चा स्त्रीचीच होणार! स्त्री सती सावित्री असलीच पाहिजे, आपण मात्र रावणाच्या आणि दु:शासन यांच्या सावल्या होणार, तेच पराक्रम समजणार !!
राजकारणी तीही बोलतील' खपवून घेणार नाही' पण अंधारात जर यांच्या कार्यकर्त्याला पकडलं तर पोलीसावर दबाव आणतील. पोलिसांनी काही महान नाही केलं तरी समाज सुधारेल, जेव्हा आई ,'एक आई 'पुढे येईल आणि म्हणेल "माझ्या पोटी दुर्योधन आला आहे याला क्षमा नाही, याने बाईची नाही आईची हत्या केली आहे.."
अरे सगळं मिळतं ते या जगात मग ओरबाडून घेण्यात मज्जा, थ्रील वाटत आहे विकृतांना !! आणि ते वाढतंच आहे ..फोन नाही उचलला, मेसेजला रिप्लाय नाही दिला, प्रेमाचे उत्तर प्रेमाने नाही दिले, हे  मारायचं कारण? इतकं स्वस्त जीवन स्त्रीचं? .. शिका, सवरा ,मोठं व्हा, पायावर उभं रहा आणि पुढे काय?? पदोपदी धोक्यात जीवन ..
आता प्रत्येक स्त्री ला स्वसंरक्षणाचे धडे दिलेच पाहिजेत. आणि ते प्रशिक्षण वापरायची हिंमत आणि आईने मुलं अगदी आदर्श नाही पण अमानवी होऊ नये असे प्रयत्न कोवळ्या वयात केलेच पाहिजेत ..
स्त्री शूद्र नाही ती ही पुरुषा एवढाच 'नाही म्हणायचा' हक्क ठेवते!
एखादया स्त्री ने एक तर्फी प्रेमातून पुरुषांच्या तोंडावर ऍसिड फेकलं असं ऐकलं का कोणी आतापर्यंत ,  नवऱ्याला घरा दाराला पोसते, काम करते ,करिअर करते पण नवऱ्याने बाहेर लफडं केलं म्हणून त्याचा जीव घेतला असं फार नाही ऐकलं आपण ..मुळात माणूस म्हणून जे पुरुषाला मान्य आहे ते स्त्रीला अमान्य नाही एवढी विचारसरणी रुजवायची आहे ..
स्त्री देवी आहे पण माणूस अजिबात नाही हे आता पुरे प्लीज जगू द्या बिचारीला तिची वेळ आली नसताना, तिची जगण्याची इच्छा असताना...... का मरावं तिने ..का??

पंकजा गोपीनाथ मुंडे


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.