ज्योत से ज्योत जलाते चलो

1 min read

ज्योत से ज्योत जलाते चलो

ज्योतसे ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो राहमे आये जो दिन दुखी सबको गलेले लगाते चलो

'दिवे पाजळणार नाही' असा ठाम पावित्रा घेणारे विज्ञानवादी लोक पक्के नास्तिक, निरीश्वरवादी, ईश्वराचे अस्तित्व नाकारणारे समजावेत का...? अशा लोकांनी देव बासनात गुंडाळलेले असतील का...? वयोमानपरत्वे तुमचे-आमचे रमेश देव-सीमा देव हे रिटायर झालेले आहेत. पण या विज्ञानवादी, नास्तिक लोकांनी डॉ. श्रीराम लागुंच्या सांगण्यानुसार 'त्या' देवाला 'रिटायर' केलं असेल काय...?

'दिवा लावणारच नाही' असं मनाशी पक्के केलेल्या लोकांच्या आई, आजी, पणजीने घरातल्या मंदिरांमध्ये, गावातल्या मारुतीच्या देवळात, दीपमाळांत, गोपुरांवर, घराबाहेरील वाटेवर, रस्त्यांवर दिवे का बरे लावले असतील...? या 'दिवे' लावणीचा अर्थ त्यांना काय अभिप्रेत असेल...? त्याचा अर्थ किंवा मतितार्थ किंवा उद्देश किंवा हेतु, ज्यांनी उभ्या हयातीत 'दिवा लावणे' चुकवले नसेल, त्यांची मुले, नातवंडाना समजला असेल का...? आता खरेच यांच्या दिवेलावणीची वेळ आली आहे.

‘तमसो मा ज्योतिर्गमय’चा नेमका अर्थ काय...? पूर्णपणे जाणूनबुजून अर्थाचा अनर्थ करणाऱ्या बुद्धिजीवी लोकांना 'तमसो मा...' याचा अर्थ शाळेत कोणी सांगितला असेल असे वाटते का...? 'दीपज्योती नमोस्तुते' असं का म्हणतात...?
'दिव्या दिव्या दीपत्कार
कानी कुंडल मोतीहार
दिव्याला पाहून नमस्कार...'
असं का म्हटलं जात असेल...?

'दिवा लावणार नाही' अशी खुणगाठ मनात बांधली आहे, ते 'दिवाळीची आरास मी करते
तेजाला मी दिव्याने पूजिते...' असं दिवाळीत चार दिवस का बोलतात...?
यामागे नक्की कोणती संकल्पना असेल...?

'ज्योत से ज्योत जलाते चलो
प्रेम कि गंगा बहाते चलो...'
असे जे भावुक होऊन गातात, ते 'फ़िक्र' हवेत उडवून लावतानाच 'ज्योत से ज्योत' शिलगावतात काय...?

आणि हो,
'राहमें आये जो दिन दुखी
सबको गलेसे लगाते चलो...'
असं ज्यांचं ज्यांचं ब्रीद आहे, विशेषतः राजकारणी, ते आता कोरोनाबाधितांच्या गळ्यात गळे घालून जगाला संदेश देतील का...? कोरोनाग्रस्ताच्या वार्डमध्ये अंथरुण टाकून पडतील का...?
तेलाच्या दिव्यानी प्रकाश अधिक पसरतो की अकलेच्या दिव्यानी...? अकलेच्या दिव्याचा प्रकाश हा नवा मार्ग दाखवणाराच प्रकाश देतो का? की ज्ञानाचा प्रकाश अधिक महत्वाचा व दूरवर पोहचणारा असतो....? अक्कलरूपी दिवा आणि ज्ञान दिवा यापैकी कोणता दिवा पाजळायला हवा...?

तळटिप : मी रुढी-परंपरावादी, कर्मकांड करून गुजराण करणाऱ्या जाती-जमातीचे प्रतिनिधित्व करतो. पण ही प्रथा, रिवाज शंभर वर्षापूर्वीपासून आमच्यात कोणी पाळत नाही. शेती हाच आमचा मुख्य पिढीजात व्यवसाय होता. आता शेतीसोबत व्यापार, व्यवसायात आहोत.
मी ना थाळी, ना टाळी वाजवली. ना मी दिवे लावणार... मी, आम्ही विज्ञानवादी आहोत. पण 'देव' ही संकल्पना मानतो. श्रद्धा आहे. कारण 'अब दवा के साथ साथ दुवा की भी जरूरत है...!' यावर माझा, आमचा ठाम विश्वास आहे...
म्हणून दिवे लावणीच्या आदेशाचे कदापि समर्थन नाही, आणि 'अकलेचे दिवे' पाजळणाऱ्या क्षुद्र वृत्तीसोबतही नाही... !!!