कुटुंबाच्या भेटीसाठी जाणाऱ्या पोलिसाचा अपघाती मृत्यू

1 min read

कुटुंबाच्या भेटीसाठी जाणाऱ्या पोलिसाचा अपघाती मृत्यू

अमरावती ते लातूर दुचाकी प्रवासाचे धाडस भोवले

हिंगोली/प्रद्युम्न गिरीकरः लॉकडाऊनमुळे चार महिन्यापेक्षा अधिक काळ आई-वडिलांची भेट न होऊ शकल्यामुळे रजा मिळताच भेटीसाठी थेट अमरावती ते लातूर असा दुचाकी प्रवास करत निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हिंगोली शहराजवळील वळण रस्त्यावर आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.

हनुमंत विष्णू मुर्टे वय 27 वर्ष, मूळ रा. मुरुदड, जिल्हा लातूर हे अमरावती ग्रामीण पोलिस विभागात पोलीस कर्मचारी पदावर 2018 पासून कार्यरत होते. लॉकडाऊन दरम्यान कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांना गावाकडे जाऊन आई-वडिलांची भेट घेता आली नव्हती. अखेर वरिष्ठांनी नुकतीच त्यांची पंधरा दिवसांची अर्जित रजा मंजूर केल्यानंतर इतर वाहने उपलब्ध नसल्याने त्यांनी अमरावती ते लातूर असा दुचाकी प्रवास करण्याचे धाडस केले. हिंगोली बाहेरून जाणाऱ्या वळण रस्त्यावर सकाळी आठच्या सुमारास हनुमंत हे दुचाकी क्रमांक एम एच 24 बीएफ 4503 वरून जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.