लाखाच्या दारूसह चार चाकी वाहन जप्त

1 min read

लाखाच्या दारूसह चार चाकी वाहन जप्त

बाहेर जिल्ह्यातून अवैधरित्या येत होती दारू

हिंगोली- जिल्ह्यात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर बाहेर जिल्ह्यातून अवैधरित्या विक्रीकरिता मोठ्या प्रमाणात दारू साठा येत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा महामार्गावर वाहनांची तपासणी केली असता एक लाख रूपयांच्या अवैद्य दारूसाठ्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी यासह सह विविध गावांमधील अनेक भागांमध्ये जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी जारी केली आहे. या पार्श्वभूमीवर अवैधरित्या दारू विक्री करणारे सक्रिय झाले होते. सदर माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर सोमवारी रात्री आठच्या सुमारास वारंगा फाटा येथे वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी बोलेरो गाडी क्रमांक एम एच 26, 4053 या वाहनातून देशी व विदेशी मद्याचा 96 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. सदर दारू साठा वाहतूक करणारे अमोल वाकोडे गजानन बार मालक, रा. पिंपरखेड तालुका हदगाव व संतोष पत्रे राहणार तोंडापूर या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर व्यक्तींनी अनिकेत पावडे देशी दुकान चालक नांदेड व वैभव देशमुख दुकान व्यवस्थापक या दोघांकडून अवैधरित्या देशी मद्यसाठा खरेदी केल्याचे समोर आल्याने सदर दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक किशोर पोटे, संभाजी लेकुळे, विलास सोनवणे, शंकर जाधव, विशाल घोळवे, किशोर कातकडे, ज्ञानेश्वर सावळे, दीपक पाटील, टापरे, काळे या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.