लातूर जिल्ह्यात ३८,१९८ पदवीधर मतदार...!

1 min read

लातूर जिल्ह्यात ३८,१९८ पदवीधर मतदार...!

लातूर जिल्ह्यातील ३८,१९८ मतदार मतदान करतील. यासाठी एकूण ८८ केंद्र उभारले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.

लातूर : औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत लातूर जिल्ह्यातील ३८,१९८ मतदार  मतदान करतील. यासाठी एकूण ८८ केंद्र उभारले जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे.

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, महापालिका आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे यांच्यासह औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी नियुक्त केलेले नोडल अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत पुढे म्हणाले की, या निवडणूकीसाठी जिल्हयात एकूण ३८,१९८ मतदार आहेत. तर ८८ मतदान केंद्रावर प्रक्रिया होणार आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित विभाग व विभाग प्रमुखांनी वेळेत कार्यमुक्त करावयाचे आहे. तसेच या अधिकाऱ्यांना आरोग्याची कोणतीही समस्या नसावी याची दक्षता घ्यावी,असे  सूचित केले.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक प्रक्रिया ही लोकसभा-विधानसभा निवडणूक प्रक्रिये सारखीच आहे. त्यामुळे त्या निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने ज्या पध्दतीने आदर्श आचारसंहिता लागू केलेली होती. त्याच पध्दतीने या निवडणूकीसाठी सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे त्यांनी सूचित केले.
तसेच या निवडणूकीच्या अनुषंगाने अनेक पथकांची व कक्षांची निर्मिती करण्यात आलेली असून संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.

आचारसंहिता कालावधीत कोणतेही शासकीय कार्यक्रम, उद्घघाटन, भूमीपूजन करता येणार नाहीत,  तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा दौऱ्यावर येणारे मंत्री यांना भेटता येणार नाही, या सर्व बाबींची योग्य ती दक्षता घेऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सूचित केले.

प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती सूचिता शिंदे यांनी दिनांक २ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२० या कालावधीत औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती दिली.
या निवडणूकीसाठी ३८,१९८ मतदार असून यात पुरुष मतदार २९,६६१, स्त्री मतदार ८,५३५ व इतर मतदार संख्या २ इतकी आहे. जिल्हयातील ८८ मतदान केंद्रावर मतदान होणार असून ३१ झोन असून ४५ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती  केली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याप्रमाणेच ४२४ मतदान केंद्राध्यक्षाची आवश्यकता असून मतदानासाठी २१२ जम्बो मतपेटया लागणार आहेत, अशी माहिती श्रीमती शिंदे यांनी देऊन सर्व नोडल अधिकाऱ्यांनी निवडणुक काळात करावयाच्या कामाची माहिती दिली.