लातुरातील रेडिमेड कापड दुकाने सायंकाळी
सातपर्यंतच : प्रदीप सोलंकी

1 min read

लातुरातील रेडिमेड कापड दुकाने सायंकाळी सातपर्यंतच : प्रदीप सोलंकी

लातूर शहरातील रेडिमेड कापड दुकाने यापुढे सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत उघडी ठेवण्याचा निर्णय.

लातूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाळण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत असतानाच यापुढील काळात नेहमीकरीता लातुरातील रेडिमेड कापड दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा रेडिमेड असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप सोलंकी यांनी दिली.
याबाबत लातूर शहरातील रेडिमेड कापड व्यापाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजघडीला जवळपास ९० टक्के दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत बंद केली जात आहेत. वास्तविक पाहता केवळ कोरोना संसर्गाच्या काळातच नव्हे तर यापुढील काळात नेहमीसाठीच  ही वेळ सगळ्यांसाठी अगदी योग्य अशी आहे. कारण, त्यामुळे  दुकानात काम करणारे कर्मचारी - व्यापारी बांधवही लवकर घरी पोहचून आपल्या परिवाराला, मुलांबाळांना पुरेसा वेळ देऊ शकतील यावर विचारविनिमय करण्यात आला. पूर्वी  बाजारपेठ सकाळी साडेदहा अकराच्या सुमारास सुरु होऊन ती रात्री उशिरापर्यंत म्हणजे  साडेनऊ  - दहा वाजेपर्यंत चालू ठेवली जायची. परिणामतः व्यापारी - कर्मचारी आपल्या कुटुंबाला फारसा वेळ देऊ शकत नसत. बाजारपेठ सकाळी लवकर चालू झाली तर ती सायंकाळी सातपर्यंत बंद करणे सहज शक्य आहे. याचा फायदा बाहेरगावाहून येणाऱ्या नोकर - कर्मचाऱ्यांनाही होऊ शकणार आहे. बाजारपेठ लवकर बंद झाली तर वीजेची राष्ट्रीय तसेच वैयक्तिक बचत होऊ शकणार आहे. तसेच त्यामुळे चोरीच्या घटनातही घट होऊ शकणार आहे. तसेच वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे. या सर्व बाबींचा गांभिर्याने  विचार करून लातूर रेडिमेड असोसिएशनने लातूर शहरातील रेडिमेड कापड दुकाने यापुढे सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व ग्राहक बांधवांनीही या निर्णयास पाठिंबा द्यावा व या वेळेतच खरेदीसाठी बाजारात यावे, असे आवाहनही प्रदीप सोलंकी यांनी केले आहे.
या बैठकीस मुकेश जोधवानी, अमोल तांदळे, सचिन लोहिया, उद्धव पिनाटे, हेमंत भावसार, अच्युत पाटिल, फिरोज पानगावकर, जितेंन गंगर, बुलबुले, ढगे, अंकुश वरियानी, प्रतीक जोधवानी, ओमकार हंचाटे, पुखराज चौधरी, अशोक चिद्रेवार , अमृत ढगे उपस्थित होते.