एलसीबीची धडक कारवाई, 22 लाखांच्या गुटख्या सह काळ्या बाजारात जाणारा दीड लाखाचा तांदूळ पकडला.

1 min read

एलसीबीची धडक कारवाई, 22 लाखांच्या गुटख्या सह काळ्या बाजारात जाणारा दीड लाखाचा तांदूळ पकडला.

हिंगोली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने दोन दिवसात दोन मोठ्या कारवाया

हिंगोली: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने दोन दिवसात दोन मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये 22 लाख 44 हजार रुपयांच्या गुटख्यासह काळ्याबाजारात विक्री करीता नेण्यात येणारा 1 लाख रुपयांचा तांदूळ पकडण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी परभणी येथून वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे काळ्याबाजारात विक्रीकरीता नेण्यात येणारा 51 क्विंटल तांदूळ शहरा जवल असणाऱ्या दिग्रस कराळे फाट्यावर पकडला. याप्रकरणी टेम्पो क्रमांक एम.एच.3591 चालक नागेश कांबळे रा. ब्राह्मणगाव तालुका परभणी यास अटक करण्यात आली आहे. सदर तांदूळ हा परभणी येथील राशन दुकानदार अनिल आप्पा घनवटे यांच्या नवा मोंढा भागातील गोदामातून भरून रिसोड येथे येत असल्याचे समोर आले आहे.
या पाठोपाठ आज 1 ऑक्टोबर रोजी वाशिम य़ेथून नांदेडकडे जात असलेल्या आयशर क्रमांक एम.एच.48-0904 या वाहनाची कलगाव शिवारामध्ये तपासणी केली असता. त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला आर.जे.कंपनीच्या गुटख्याचे 110 पोते आढळून आले. सदर गुटख्याची किंमत ही 22 लाख 44 हजार रुपयांच्या घरात असून. याप्रकरणी चालक शेख बबलू शेख करीम व शेख जाकीर शेख करीम रा. मोहम्मदिया नगर अर्धापूर जि. नांदेड या दोघांना अटक करण्यात आली आहे. नऊ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 31 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुटखा अमरावती जवळील गोदामातून भरून नांदेड येथे येत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईच्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक किशोर पोटे, पोलीस कर्मचारी बालाजी बोके, संभाजी लेकुळे, विलास सोनवणे, भगवान आडे, शेख रेश्मा, राजा सिंग ठाकूर, सुनील अंभोरे, आशिष उंबरकर, किशोर कातकडे, यांनी सहभाग नोंदविला.