विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज परभणीत, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

1 min read

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज परभणीत, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन आपले झालेले नुकसान फडणवीस यांच्यासमोर मांडण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी संयुक्तपत्रकाद्वारे शेतकऱ्यांना केले

परभणी : माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे परभणी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. चार दिवसांपूर्वी झालेला अवकाळी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे हाती येणारे पीक गेले आहे. यात सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्षाचे नेतेही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या हेतूने काम करत आहेत.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मागील चार दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे सांत्वन करून मदत मिळवून देण्यासाठी आग्रही आहेत. त्या अनुषंगाने अंबाजोगाई येथून ते परभणी जिल्ह्यातील निळा येथे आज दुपारी चार वाजता नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून आपली भूमिका मांडणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन आपले झालेले नुकसान फडणवीस यांच्यासमोर मांडण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मव्हाळे यांनी संयुक्तपत्रकाद्वारे शेतकऱ्यांना केले आहे. या दोऱ्यानंतर फडणवीस हे गंगाखेड येथे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी राखीव वेळ ठेवून परभणी येथे मुक्काम करतील असे त्यांच्या कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आले आहे.