मराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर

महाविकास आघाडी सरकारचा शेती, आरोग्य, पाणी प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे.

मराठवाड्याच्या प्रश्नाकडे आघाडी सरकारचे दुर्लक्ष : माजी मंत्री आ. निलंगेकर

लातूर : मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे, हे कुणीतरी मुख्यमंत्र्यांना सांगण्याची वेळ आली आहे. मुंबईच्या प्रश्नाइतकेच महाराष्ट्राचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते कोण सोडवणार?, असा सवाल माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला. महाविकास आघाडी सरकारचा शेती, आरोग्य, पाणी प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन आहे. पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे ताबडतोब  पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी, असे वारंवार सांगूनही पंचनामे होत नाहीत. कारण आघाडी सरकारमध्ये  इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका आमदार संभाजीराव पाटील यांनी केली.

लातूर शहर भाजपाच्या वतीने विविध मागण्यासाठी येथील गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलन प्रसंगी माजी मंत्री आमदार निलंगेकर बोलत होते.

कोरोना संसर्गाच्या बाबतीत गंभीर नसलेल्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता परेशान झालेली असतानाच राज्यकर्ते मात्र क्वॉरंटाईन झालेले पहाण्यास मिळत आहेत. औषधांचा तुटवडा व ऑक्सीजनचा अभाव यामुळे कोरोनामुळे मृत्यू पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे कोरोनाने जनता परेशान असताना दुसरीकडे अतिवृष्टीने शेतकरी हैराण झालेला आहे. मात्र राज्य सरकारला याचे कांहीच घेणे-देणे नाही. या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असल्याने राज्यकर्त्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आ. संभाजी पाटील यांनी केली.

राज्यात कोरोनासाठी आवश्यक असणारी औषधे यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.  ऑक्सीजनची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात कोरोनाने मृत्यू पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याला केवळ आणि केवळ राज्यकर्तेच जबाबदार असल्याचे सांगत त्यामुळेच निष्क्रीय राज्यकर्त्यांवर मनुष्यवधाचा म्हणजे ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. निलंगेकरांनी यावेळी केली.
एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असताना दुसरीकडे अतिवृष्टीने शेतकरी परेशान झालेला दिसून येत आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने दिलासा देणे आवश्यक असतानाही अजूनही अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची व इतर नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणत्याच हालचाली झाल्याचे पाहाण्यास मिळत नाही असे आ. निलंगेकरांनी यावेळी सांगितले.

कोरोनाने सर्वसामान्य जनता त्रस्त असून अतिवृष्टीने शेतकरी परेशान आहे. तरीही राज्य सरकार गंभीर नसल्याने विरोधीपक्ष या नात्याने आम्ही आता आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलो आहोत. गेली सहा महिने राज्यकर्त्यांना सहकार्या केले असून आता जनतेसाठी रस्त्यावर उतरल्याचे सांगून आ. निलंगेकर यांनी राज्यकर्त्यांनी लवकरच याबाबत ठोस निर्णय घेऊन सर्वसामान्यांना दिलासा व शेतकर्‍यांना मदत नाही मिळून दिल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी आ. निलंगेकर यांनी दिला.

लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आमची सत्ता आल्यास महिनाभरात उजनीचे पाणी देऊ, असे आश्वासन लातूकरांना दिले होते. मात्र नऊ  महिने लोटले असले तरी अजूनही उजनीच्या पाण्याबाबत कोणतीच हालचाल पालकमंत्र्याकडून पहाण्यास मिळत नाही. सर्वसामान्य जनतेला दिलेल्या आश्वासनाचा विसर तुम्हाला पडला असला तरी आम्ही ते विसरलेले नसून जनतेसाठी उजनीचे पाणी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळेच पालकमंत्र्यांनी उजनीचे पाणी लातूरला दिल्यास आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू, असे आ. निलंगेकरांनी जाहीर केले.

यावेळी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी उपमहापौर देविदास काळे, व्यंकट पन्हाळे आदिंनी राज्यकर्त्यांच्या अपयशाचा पाढा वाचला. धरणे आंदोलानंतर आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.

या निवेदनाच्या माध्यमातून लातूरला उजनी धरणाचे पाणी मिळावे, मराठा आरक्षण तात्काळ लागू करावे, कव्हा येथील विभागीय क्रिडा संकुलाचे काम तात्काळ सुरु करावे, राज्य सरकारने कोरोनाच्या पाश्वभुमीवर सर्वसामान्यांना तात्काळ मदत करावी, लॉकडाऊन काळातील विद्युत देयके माफ करावी, राज्यात कोरोनासाठी आवश्यक असणारे औषधे व ऑक्सीजनचा मुबलक पुरवठा करून कोरोनाग्रस्तांची लुबाडणूक तात्काळ थांबवावी आदि मागण्या केलेल्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.