चला जोडूया स्वत:ला

सत्य, सुंदर, मंगलाची नित्य आराधना करत वारी निघते. चालणा-या पायांना ओढ पांडुरंगाची असते. त्याच्याशी नाते जोडण्यासाठी, जोडलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी राज्यभरातून जनसागर पंढरीकडे झेपावतो.

चला जोडूया स्वत:ला

महाराष्ट्रः सत्य, सुंदर, मंगलाची नित्य आराधना करत वारी निघते. चालणा-या पायांना ओढ पांडुरंगाची असते. त्याच्याशी नाते जोडण्यासाठी, जोडलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी राज्यभरातून जनसागर पंढरीकडे झेपावतो. चंद्रभागेला भरतीच येते जणू. आपल्या सहस्त्रावधी लाटांनी पांडूरांगाच्या पायाचे प्रक्षालन करण्यासाठी हा जनसागर पंढरीकडे धावतो आहे. यात सामावणा-या प्रत्येकाला भक्तिरसात चिंब करत हा जनसागर पुढे पुढे सरकत आहे.या सागराचे वैशिष्ट्यच ते आहे. या मार्गात जो येतो तो जोडला जातो थेट पांडूरंगाशी आणि प्रत्येकजण थेट विठूमाउलीशी नाते जोडायला आतूर झालेला आहे. मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा ही भावना आता सगळ्यांच्याच मनात येऊ लागते. ही किमया त्या वातावरणाची, त्या भक्तीची असते. या भक्तीसागरात अनेक योगी असतात जे वाटाड्याच्या रूपात तो पांडुरंगाशी जोडणारा मार्ग आपल्याला सांगून जातात. यात मध्यस्थाशी भुमिका नसते तर मार्गदर्शकाची असते.

ईतर कोणाच्या कृपाप्रसादाने नाही तर थेट आपल्या मनातील भक्तीने पांडुरंगाला आपले कसे करता येईल हा मार्ग या दिंडीतील योगी पुरूष सांगून जातात.‘योगी’ हा शब्द योगा या शब्दापासून बनला आहे. योग हा शब्द ‘युज्’ या धातूपासून बनला आहे. ‘युज्’ याचा अर्थ जोडणे असा होतो. जो जोडतो तो योगी आणि आत्म्याला थेट परमात्म्याशी जोडणारे अनेक योगी भागवत धर्मात आहेत. याच मार्गावर जाण्यासाठी दिंडीची वाट धरावी. एकनाथांनी खुप सुरेख पद्धतीने सांगितले आहे.
मेघमुखे अधःपतन। अधःपाते निवती जन।
अन्नदान सकळासी।
तैसे योगियाचे खालुते येणे। जन निववी श्रवन किर्तने।
निजज्ञान उध्दरी
मेघमुखातून पडणारे पाणी जसे हिरवळ निर्माण करून अन्नाची उत्पत्ती करते आणि लोकांना सुखी करते तसे, योगी पुरुष आपल्या ज्ञानाच्या आधारे सामान्य जनाचा उध्दार करत असतो. तो मार्गदर्शक असतो. योग्य अयोग्यचा मार्ग सांगणारा असतो. आणि आपल्या भक्तीच्या बळावर आणि योग्याच्या मार्गदर्शानाच्या साह्याने आपण त्या सावळ्याशी नाते जोडू शकतो.

योगी मार्गदर्शन कसा करतो बघा. त्याच्या मार्गदर्शनात कधीच गडबड होत नाही. ईश्वरप्राप्तीचा खरा मार्ग योगी सांगून जातो
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुला।
देव तेथेची जाणावा। तोची साधू ओळखावा
हा मंत्र आपल्या सगळ्यांना ईश्वरप्राप्तीचा खरा मार्ग सांगून जातो. असे निर्भेळ मार्गदर्शन असले की मग यातून मिळणा-या आनंदाला कसलीच विकृती असत नाही हे तेवढेच सत्य आहे.
उदकाचे सुख ते किती। सवेची क्षणे तृषिते होती।
योगिया दे स्वानंद तृप्ती। सुखासी विकृती पै नाही।
ही स्वानंदतृप्ती मिळविण्यासाठीच आपण सगळे धडपडत असतो. आणि साधू संताच्या सानिध्यात ही तृप्ती आपण सहजरीत्या मिळवून जातो.
संत कबिरजीनी आपल्या दोह्यात सांगीतले आहे,
गुरू गोविंद दोनु खडे काके लागूँ पाव
बलीहारी गुरू अपना दियो गोविंद दिखलाए
ज्याने मला गोविंद असल्याची जाणीव करून दिली तो गुरू पहिल्यांदा वंदनीय आहे. कारण या परिचयाशिवाय मला माझा देव दिसला असता तरी कळला नसता. आपल्या डोळ्यावरची अज्ञानाची पट्टी हटल्याशिवाय प्रकाश दिसणार तरी कसा. ही पट्टी दूर करणारा संत असतो. तो आपली दृष्टी साफ करतो. आणि आपल्या परमेश्वराला ओळखण्याचे बळ आपल्याला देतो. हे बळ मिळविण्यासाठी वारी आणि दिंडी महत्वाचे साधन ठरते. सगळे एका पातळीवर येतात सगळेच माऊली असतात.

थाळी एक अन्न एक, मार्ग एक, मंत्र एक, दिशा एक, चिंतन एक, हेतू एक, लक्ष एक या सगळ्या एकीतून आपल्याला आपल्या वेगळेपणाची जाणिवच उरत नाही. आणि मग या अफाट भक्ती क्षेत्रात आपण सामावून जातो. स्वतःचे वेगळेपण विसरले की एकरूपता येते आणि ही एकरूपताच आपल्याला त्या सावळ्याच्या जवळ घेऊन जाते.
ही दिंडी म्हणूनच योगी ठरते. केल्याने देशाटन,पंडित मैत्री,सभेत संचार या तीन गोष्टींनी माणूस शहाणा होतो, असे म्हणतात. दिंडी या तिन्ही गोष्टी आपल्याला देऊन जाते. म्हणूनच तर गोरोबाकाका सारख्या महान भक्ताला मुक्ताईसारखा मडके कच्चे आहे सांगणारा योगी गुरू भेटला आणि काका स्वतःला ओळखू शकले.
आपले मडके असेच पक्के करण्यासाठी आपणही या दिंडीत स्वतःला जोडून घेऊ.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.