कर्मे ईशू भजावा

'कर्मे ईशू भजावा' ही संकल्पना जो भागवत धर्म देतो तो काम टाळण्याची शिकवण देवुच शकत नाही. आषाढी हा रिकामपणात करायचा उद्योग नाही तर कामे संपवून ईश्वर चिंतनात त्याहीपेक्षा स्वत:च्या शोधात घालवायचा काळ आहे.

कर्मे ईशू भजावा

महाराष्ट्रः आषाढीच्या वारीला जायचं म्हणजे रिकाम्या माणसांचा उद्योग हा विचार मनात असेल तर काढून टाका. आषाढी हा रिकामपणात करायचा उद्योग नाही तर कामे संपवून जरा ईश्वर चिंतनात त्याहीपेक्षा स्वत:च्या शोधात घालवायचा काळ आहे. काम नाही म्हणून वारी ही संकल्पना वारी न अनुभविणारेच मांडू शकतात. 'कर्मे ईशू भजावा' ही संकल्पना जो भागवत धर्म देतो तो काम टाळण्याची शिकवण देवुच शकत नाही. काही जेष्ठ नागरिक वारीला जातात ती घरात काम नाही म्हणून, असे अजिबात नाही तर काम आटोपून निवृत्त झाल्यावर ते वारीचा मार्ग अवलंबत असतात.

जरा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या भावंडांची नावे बघा म्हणजे त्यातून सगळा अर्थबोध होईल. पहिले नाव निवृत्तीचे या सगळ्या व्यापातून, मोहातून निवृत्ती घेतली की मग मिळतं ते ज्ञान आणि हेच ज्ञान सोपान (मार्ग अथवा पायरी) बनत मुक्तीकडे जाण्याचा. ही मुक्ती म्हणजे सदेह वैकुंठ गमन वगैरे कोणी समजायचे कारण नाही की, संजीवन समाधीसारखा अलौकिक प्रकारदेखील नाही. मुक्ती या शब्दाचा अर्थ मुक्तता, मोकळेपणा असा होतो. आपण सगळेच अनेक प्रश्न, समस्या, अडचणी यांनी गुरफटलेले असतो. या प्रश्नाची उत्तरे शोधताना अनेक वेळा आपली दमछाक होते. कधी अहंकारवश तर कधी स्वत:च्या क्षमतेविषयीचा अनाठायी अंदाज यामुळे आपण नेहमीच अडचणीत सापडतो. तर कधी इतरांसाठी आपण काहीतरी करतो आणी त्याने आपल्यासाठी काहीच केले नाही हा भाव आपल्या मनाला यातना देवुन जातो. मी करतो पण माझ्यासाठी कोणीच करीत नाही हा विचार आपल्या मनात रुंजी घालतो आणी हाच विचार आपल्याला समस्यांच्या बंधनात बांधू लागतो. आपण कोण हाच शोध मुळी आपल्याला लागलेला नसतो.

बिजरुपी तुची । करी पेरणी स्वत:ची ।
उगवेल कणीस । ऐश्वर्याचे ।

ही साधी गोष्ट आपण सगळे विसरुन गेलेलो असतो. याच गोष्टीची जाण होणे आवश्यक असते. आणि वारी आपल्या सहज भावातून ही गोष्ट शिकवुन जाते. संतांची मांदियाळी, त्यांचे चरित्र आपल्याला या मी पणाच्या भावनेतून मुक्त करते आणि जिवनाची सहजता आणि त्याहिपेक्षा आपल्या कर्तव्याचा भाग शिकवून जाते. एकदा स्वत:ची ओळख झाली की, मग मुक्ती मिळते अडचणीतून, नको त्या विचारातून आणि मन कामात लागतं ‘कर्मे ईशू भजावा’ हे अगम्य समजू लागते.
संतश्रेष्ठ सावता माळी यांनी हेच‘कर्मे ईशू भजावा’हे तत्वज्ञान सांगितलेले आहे. तुमच्या कामाला तुम्ही भगवंत मानले की, त्यातही ईश्वरी अंश सहजतेने येतो हेच तर सावता माळी आपल्याला सांगतात.
कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी ।
विहीर नाडा मोट दोरी । अवघी व्यापली पंढरी ।।

हा अभंग आपल्या कामात हरी आहे हे सांगून जात नाही का ? आपण सगळेच त्याला इतरत्र शोधत असतो. तो आपल्या अंतरी नांदतो हे आपण विसरुन जातो. याचाच शोध घेण्यासाठी आपल्याला वारीला जायचे असते. कामातला ईश्वर शोधण्यासाठी वारी करायची असते. काम टाळण्यासाठी नाही. हे सर्वात पहिल्यांदा आपण ध्यानात घेतले पाहिजे.

उदाहरण कोणतेही घ्या. आपला हरी आपल्या जवळ आहे. हे पक्के मनी बाळगले की, तो आपल्या जवळ येतोच येतो, हे सगळ्याच संत चरित्रातून सिद्ध झाले आहे. नामदेवांना नागनाथच्या मंदिरात समोरच्या बाजूला किर्तन करु दिले नाही, नामदेवांनी मंदिराच्या मागे किर्तन सुरु केले.
महादेवाने म्हणे मंदिराची दिशाच बदलली. यातील चमत्काराचा भाग सोडू पण ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट करण्याची किमया आपल्या श्रमात असते हे विसरुन कसे चालेल. गोरोबा काकांनी आपल्या पायाखाली माती तुडवत पांडुरंगाचा धावा केला. चोखामेळ्याला कर्मठ आणि सनातनी पांडुरंगाच्या भेटीला जाऊ देत नव्हते तेव्हा आपले काम कायम चालू ठेवत चोखोबांनी थेट आपल्या देवालाच प्रश्न विचारला
जन दूर दूर हो म्हणती । तुज भेटु कवण्यारिती ।।
आणि काय आश्चर्य थेट पांडुरंग चोखोबांच्या भेटीला आला. आपले मन चंगा असेल तर रापी भिजवायच्या पाण्यातही गंगा येऊ शकते हे सांगणारे रोहिदास या कर्मे ईशु भजावा या गोष्टीचे तर प्रतीक आहेत ना. आपणही आपल्या कामात भगवंत शोधू या.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.