जलसंधारणाच्या 63 कामांवरील स्थगिती उठवली; राज्यपालांचे पत्र

1 min read

जलसंधारणाच्या 63 कामांवरील स्थगिती उठवली; राज्यपालांचे पत्र

राज्यपालांच्या पत्रामुळे नियोजन व वित्त विभागाचा निर्णय

हिंगोली /प्रद्युम्न गिरीकर : सिंचनाच्या दृष्टिकोनातून मागास असणाऱ्या हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मंजूर झालेल्या 63 कामांना राज्यशासनाने स्थगिती दिली होती. याबाबत राज्यपालांनी पाठविलेल्या पत्रामुळे वित्त व नियोजन विभागाने सदर कामांवरील स्थगिती उठवली आहे. यामुळे सदर कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषाचा प्रश्न प्रलंबित होता. यापूर्वीचे राज्यपाल सी. विद्यासागरराव यांच्या भूमिकेमुळे सिंचन अनुशेषाचा प्रश्न मार्गी लागला. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांना मंजुरीदेखील देण्यात आली. याअंतर्गत 12 फेब्रुवारी 2020 रोजी जिल्ह्यातील जलसंधारणाच्या 63 कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 21 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाले. त्यापाठोपाठ 4 मे 2020 रोजी राज्य शासनाच्या वित्त व नियोजन विभागाच्या निर्णयामुळे सदर कामांना स्थगिती देण्यात आली होती.
परंतु राज्यपाल यांच्या 2019- 20 व 2020- 21 या वार्षिक कार्यक्रमांतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांना देण्यात आलेली स्थगिती सदर विभागाने उठविण्यात यावी; यासंदर्भात विद्यमान राज्यपालांनी राज्याच्या नियोजन व वित्त विभागाला पत्र पाठविले होते. त्या अनुषंगाने 12 नोव्हेंबर 2020 रोजी सदरील कामांवरील स्थगिती उठविण्यात आल्या संदर्भात राज्याच्या मृद व जलसंधारण विभागास कळविण्यात आले. याबाबत सदर विभागाच्या कक्ष अधिकारी आंबेकर यांनी औरंगाबाद अप्पर आयुक्त जलसंधारण यांना पत्र पाठवून सदर निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे कळविले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांना गती मिळणार आहे.