लॉकडाऊनला विरोध वंचित बहुजन आघाडीच्या 12 जणांवर गुन्हा दाखल

1 min read

लॉकडाऊनला विरोध वंचित बहुजन आघाडीच्या 12 जणांवर गुन्हा दाखल

लॉकडाऊन उधळून लावण्याचा इशारा

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: हिंगोली जिल्हयात 6 ते 19 ऑगस्ट दरम्यान चौदा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून लॉकडाऊन कमी करा किंवा रद्द करावा अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान लॉकडाऊन उधळून लावण्याचा इशारा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या बारा जणांविरुद्ध हिंगोली शहर पोलिसांत आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिका-यांनी दोन दिवसांपूर्वी 6 ते 19 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. हा 14 दिवसांचा लॉकडाऊन होत असल्यामुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होणार आहे. फुटकळ व्यापाऱ्यांसह हातावर मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात यापूर्वी सेनगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने लॉकडाऊन रद्द करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. कळमनुरी येथील नागरिकांनी देखील प्रशासनाला निवेदन सादर करीत लॉकडाऊनचा कालावधी कमी करण्याची मागणी केली होती. हिंगोली शहरातील नागरिकांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जावेदराज यांनी देखील प्रशासनाकडे निवेदन सादर करीत सदर लॉकडाऊन कमी करण्याची विनंती केली आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या घोषणेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लॉकडाऊन उधळून लावण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे हिंगोली शहर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा १८८ अंतर्गत रविंद्र वाढे, ज्योतीपाल रणवीर, जिल्हाध्यक्ष वसिम अहेमद देशमुख, बबन भूक्तर, योगेश नरवाडे, सुनंदाताई वाघमारे, विक्की काशीदे, शेख गण्णी आदी १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.