माधव पिटले/निलंगा : प्रेम...या एका अडीच अक्षरासाठी औषध कंपनीत काम करणाऱ्या तरुण कर्मचाऱ्याने नशेचे औषध घेऊन आपले जीवन संपविल्याची हदयद्रावक घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा तालुक्यातील सावनगीर येथील अर्जून संजय सोळुंके (वय २५) हा मुंबईतील एका औषध कंपनीत काम करत होता. तिथेच त्याचे एका मुलीवर प्रेम जडले. सगळे काही सुरळीत चालू होते व प्रेमाच्या आणाभाका दोघांनी घेतल्या. परंतु काही कारणास्तव त्यांच्यात बेबनाव झाल्याने जगणे निरर्थक वाटू लागले व नैराश्यापोटी अर्जूनने नशाच्या गोळ्या व हृदय बंद पडण्याचे इंजेक्शन घेण्यास सुरूवात केली. शरीर प्रकृती एवढी बिघडली की त्याला लातूर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र जास्त विषारी औषधी घेतल्याने शरीर संपूर्णपणे निकामी झाले होते. यातच त्याचा मंगळवारी सांयकाळी ७ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे सावनगीर गावावर शोककळा पसरली आहे.
निव्वळ प्रेमाच्या भावनिकतेमुळे अविवाहित तरूणाने आपला जीव गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.मयत तरूणावर त्याचे मुळ गाव सावनगीर येथे दिनांक १३ रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परीवार आहे.