'मेंस्ट्रुअल कप एक पर्यावरणपूरक शाश्वत पर्याय'- डॉ आशा चांडक

निराधार मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कपचे वाटप

'मेंस्ट्रुअल कप एक पर्यावरणपूरक शाश्वत पर्याय'- डॉ आशा चांडक

परभणी : मासिक पाळीच्या काळामध्ये सर्व स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन्स कमी किमतीत, परवडणारे व सहज उपलब्ध व्हावे याविषयी भारतामध्ये अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. ज्याचे परिणाम हळूहळू दिसू लागले. पण सॅनिटरी पॅडचा खर्च दर महिना आणि अनेक वर्ष करावे लागते. शिवाय ते वापरल्यावर त्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावणे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नुकतेच केलेल्या एका अभ्यासात भारतात सुमारे ३.६ कोटी स्त्रिया मासिक पाळीत सॅनिटरी पॅड वापरतात. दर महिन्याला १२ नॅपकिन या हिशोबाने वापरलेल्या ४३ कोटी नॅपकिनचे वजन ५००० टन होईल. कुठलेही सॅनिटरी नॅपकिन नष्ट व्हायला शेकडो वर्षे जावी लागतील. म्हणजेच वापरून फेकून देत असलेल्या पॅडचा विचार केल्यास दररोज प्रदूषणामध्ये किती फरक पडत आहे ? आणि त्याचा पर्यावरणावर किती विपरीत परिणाम होत आहे. याची आपल्याला कल्पना येईल म्हणूनच आता एक पर्याय समोर येत आहे ते म्हणजे 'मेन्स्ट्रुअल कप'.तसे पाहिले तर पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव सॅनिटरी पॅड मार्फत शोषून घेतला जातो. पण मेन्स्ट्रुअल कप मध्ये हे रक्त साठवले जाते, हे कप योनी मध्ये बसवले जातात आणि आठ तासांनी पुन्हा बाहेर बाहेर काढून धुवून पुन्हा वापरतात.

सध्या खरे तर या कप विषयी लोकप्रियता वाढत आहे. पण आजही महिलांमध्ये या पर्यायाबद्दल तितकी सजगता नाही. म्हणूनच आज होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थे तर्फे स्टेशन रोड येथील स्वाध्यायशक्ती अभ्यासिकेत 'मासिक पाळी व्यवस्थापनात मेन्स्ट्रुअल कप' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. ज्यास उपस्थित किशोरवयीन मुली व महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

या प्रसंगी मासिक पाळी समुपदेशन तज्ञ डॉ सौ आशा चांडक यांनी पौगंडावस्था, ऋतुचक्र (मासिक पाळी), पाळीत शरीरात होणारे बदल, मासिक पाळीत घ्यावयाची काळजी आदीविषयी सुरवातीला माहिती दिली. पुढे पाळीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध शोषके विषयी माहिती देतांना शाश्वत पर्याय म्हणून 'मेन्स्ट्रुअल कप' हा कसा उपयुक्त ठरू शकतो, त्याचे फायदे, त्याचा वापर कसा करावा, त्याचे निर्जंतुकीकरण, विविध शोषकांचा तुलनात्मक अभ्यास करून देत मेन्स्ट्रुअल कप चे महत्व पटवून दिले. या प्रसंगी डॉ आशा चांडक ज्या स्वतः मागील दीड वर्षा पासून 'मेन्स्ट्रुअल कप' वापरत असून त्यांनी स्वःअनुभवातून उपस्थितांशी संवाद साधला.

Commercial सॅनिटरी पॅड मधील विविध घटकांमुळे (Glycophosphate ) कसा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो हे देखील उपस्थित महिलांना वैज्ञानिक दृष्ट्या पटवून देण्यात आले. या प्रसंगी सहभागी महिलांनी आपल्या मनातील विविध प्रश्ने - जसे जास्त वेळ पॅड न बदलण्यामुळे होणारा Toxic Shock Syndrome, कप योनीमार्गातुन पोटात जाऊ शकते का ? त्यामुळे योनिपटलास इजा होऊ शकते का ? दीर्घ काळ कप योनीमार्गात राहिल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतो का ? कप बाहेर काढताना लिक होणे किंवा डाग पडण्याची भीती आदी प्रश्ने विचारून मनातील शंकांचे समाधान करून घेतले. डॉ आशा चांडक यांनी देखील वैज्ञानिक दृष्टिकोनातून या प्रश्नांची उत्तरे दिली.

आर्थिक दृष्ट्या परवडणारा कप: जिथे सॅनिटरी पॅड साठी दर माह ५०-८० रुपये प्रमाणे वर्षाला ६०० ते ८०० रुपये खर्च येतो. तिथे केवळ ४००/- रुपयात मेन्स्ट्रुअल कप ५ वर्ष धुवून वापरता येतो ज्यामुळे कोणताही कचरा होत नाही व पर्यावरणास हानी होत नाही.शेवटी उपस्थित गरजू किशोरवयीन मुलींना एचएआरसी संस्थे तर्फे मोफत मेन्स्ट्रुअल कप व मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रक भेट देण्यात आले.

या प्रसंगी अनुपमा जोशी, सौं. मनिषा शिंदे, अंजली जोशी, ऐश्वर्या डोंबे, सुमैया शेख आदी उपस्थित होते.
तर उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी एचएआरसी संस्थेचे डॉ पवन चांडक, डॉ आशा चांडक, प्रा पद्मा भालेराव, गोपाल मुरक्या यांनी प्रयत्न केले


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.