'मी दांभिक नाही..., पाठराखण करतो' - सुशील कुलकर्णी

वाढदिवसाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा ....! - विजयकुमार स्वामी, लातूर

'मी दांभिक नाही..., पाठराखण करतो' - सुशील कुलकर्णी

'निःपक्ष याचा अर्थ कोणताच पक्ष नाही ही भूमिका मला व्यक्तीगत माझ्या आयुष्यासाठी मान्यच होत नाही. अनेकवेळा लेख वाचल्यावर माझे हितचिंतक मला तटस्थ वाटत नाही. पक्षपातीपणा दिसतो, असा सल्ला देत मी निःपक्ष व्हावे, असा सल्ला देतात. अनेकवेळा हे घडले आहे. मी दांभिक नाही..., पण ज्यांच्याविषयी लिहितो, त्यांचे समाजातील स्थान, योगदान, कार्य, हेतु लक्षात घेऊन काही वेळा अतिशय ठामपणे पाठराखण करतो', असे स्पष्ट मत माझे मित्रवर्य व अनेक नवोदित पत्रकारांचा मार्गदर्शक सुशील कुलकर्णी नोंदवतात.
ते असे का म्हणतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्या म्हणण्यात तथ्य आढळून येते. आज सुशील कुलकर्णी यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच मला कळलेले 'सुशील' मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

सुशील जाणून घेतानाचे ठळक चार प्रसंग आठवतात. पहिला प्रसंग त्यांच्या जन्मभूमीतला, अर्थात लातूरचा. 'पुण्यनगरी'चे संपादक असताना त्यांनी स्वाती पिटले आत्महत्या प्रकरण लाऊन धरले होते. एस. टी. बसच्या पासला विलंब झाला. पास काढायला पैसे नाहीत म्हणून स्वातीने आत्महत्या केल्याची बातमी अडीच वर्षापूर्वी राज्यभर गाजली. स्वातीच्या आत्महत्येच्या बातमीने खळबळ उडाल्याने सुशील अस्वस्थ होते. किरकोळ कारणावरून आत्महत्या हे चौकस वृत्तीच्या सुशील यांच्या मनाला पटत नव्हते. एक ना अनेक प्रश्न निर्माण करून त्यांनी मला भंडावून सोडले. 'पुण्यनगरी'च्या लातूर आवृत्तीत ग्रामीण विभाग मी पहात असत. स्वातीच्या आत्महत्येची सर्वात पहिली बातमी झरी (ता. चाकूर)चे वार्ताहर अशोक वाकळे यांनी दिली व अर्थात 'पुण्यनगरी'नेच ती छापली होती.

अधिक माहिती घेऊन सुशील यांनी काही प्रश्न मांडले. स्वातीचा बस पास कधीच खंडीत झाला नव्हता. कधीच पासला उशीर झाला नव्हता. तिच्या वडीलांकडे वाहने होती. त्यांचा मळणीयंत्राचा व्यवसाय आहे. एचडीएफसी, स्टेट बँक व फायनान्ससारख्या वित्तीय संस्था ज्या व्यक्तीला कर्ज देतात व त्याची फेड नियमीत चालू आहे. कांही कर्ज पूर्णतः फेडलेली आहेत. ती व्यक्ती आपल्या मुलीला दोन-अडीचशे रूपये देऊ शकत नाही, हे सुशील यांच्या मनाला पटत नव्हते. दुसरीकडे जनरेट्यापुढे तत्कालीन परीवहन मंत्री तातडीने स्वाती अभय योजना लागू करत होते आणि माध्यमं यावर लिहीत होती. त्यावेळी देखील ठाम भूमिका घेत आत्महत्यांचे उदात्तीकरण करत एक नवा मार्ग राज्यातील मुलींना देणारा प्रयत्न थांबविण्याचा प्रयत्न सुशील यांनी केला. त्यामुळे साहजिकच कांही पत्रकार मित्र नाराज झाले. पण सत्य समोर आल्यावर सगळ्यांनाच ती भूमिका पटली. पण तेव्हा बराच उशीर झालेला होता.

दुसरे प्रकरण देखील लातूरचे. अगदीच ताजे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या कोठडीत एका आरोपीने आत्महत्या केल्यानंतर माध्यमांनी 'वर्दीतील सैतान' अशी उपाधी देऊन बावकर यांना यथेच्छ झोडपणे सुरु केले. प्रत्यक्षात बावकर यांनी आरोपीला मृत्यू होण्यापूर्वी मारहाण केली नव्हती. ज्याने आत्महत्या केली तो अपहरण आणि दरोडा अशा गम्भीर गुन्ह्यातील आरोपी होता. ज्या रकमेवर दरोडा टाकण्यात आला ती रक्कम हवालाची होती. लुटीतील माल हस्तगत करण्यासाठी वापरलेल्या पोलीसी हातखंड्याला 'भ्रष्टाचार' असे दाखवत सहाय्यक निरीक्षक सुधाकर बावकर आणि त्यांच्या टीमला बदनाम करण्यात आले. तिथेही सुशील कुलकर्णी यांनी ठाम भूमिका घेतली आणि म्हणणे मांडले. त्यांनी जे मांडले तेच खरे निष्पन्न होते आहे, अशी एकूण परिस्थिती होती हे पुढे खातेनिहाय चौकशीत निष्पन्न झाले व सुधाकर बावकर निष्कलंक सिद्ध झाले.

तिसरे प्रकरण मराठवाड्यातील एका चांगल्या चालू असलेल्या बँकाचे. नोटाबंदीच्या काळात परळीच्या वैद्यनाथ बँकेची रोकड पकडली आणि बँक त्यासोबत मराठवाड्यातील एक नामांकीत डॉक्टर उन्मेष टाकळकर यांना राजकीय हेतूने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. एक चांगली बँक आणि एक चांगला डॉक्टर बदनाम होणे योग्य नाही असे वाटून सुशील यांनी तेही प्रकरण जाणून घेत त्यातील एकेक बाब तपासली असता त्यांच्या लक्षात आलेली बाब अशी होती की, ती रक्कम अवैध नव्हती. ती रक्कम भ्रष्टाचाराची नव्हती, की तो काळा पैसा नव्हता. बँकातील आपसातील समन्वयाच्या अभावाने पैशाचा प्रवास झाला आणि मराठवाड्यातील दोन संस्था उगाच संशायाच्या भोवऱ्यात आल्या. सीबीआयची चौकशीअंती तथ्य नसल्याने प्रकरण बंद झाले.

चौथे आणि महत्वाचे प्रकरण चिक्कीचे. यात राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना गैर प्रकाराच्या आरोपांना सामोरे जावे लागले. चिक्की व दर्जा, झालेला व्यवहार यावर आरोप झाले. चौकशी झाली कांहीच साध्य झाले नाही. त्याही प्रकरणात सुशील यांची भूमिका ठाम होती. जे मांडले तसेच झाले. पण राजकीयदृष्ट्या सुशील कुलकर्णी यांना पक्षपाती ठरविण्यात आले. लोकनेते गोपीनाथराव मुंडे हयात असताना धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द उज्ज्वल आहे हे सांगणारे लिखाण अनेक वेळा केले. (आठवा 'वेन्सडे' लेख, 'वंजारी मताचा टक्का' हा लेख आणि असे बरेच कांही लेख) त्यावेळी देखील दुसऱ्या गटाकडून असाच पक्षपातीपणाचा आरोप झाला. लोकनेते गोपीनाथरावजी हयात असतानाची स्थिती आणि त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतरची स्थिती यात खुप मोठा फरक होता. आताही प्रत्येकवेळी परिस्थिती बदलत आहे. परळीचे राजकारण अजूनही हेलकावे घेत आहे. अशा स्थितीत परिस्थितीचे वर्णन करणे पक्षपात कसा होऊ शकतो हा साधा प्रश्न पडतो. पंकजाताई मुंडे यांचे कौतुक करत असताना त्यांना टोचणारे लेख देखील प्रकाशीत झाले होते. ( आठवा 'न फिरवल्याने...' हा लेख) याचा विसर अनेकांना सोयीस्कररित्या पडलेला दिसतो.

सुशील कुलकर्णी यांनी पत्रकार या नात्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार प्रशांत परिचारक, जलसंधारण मंत्री राम शिंदे ही भाजपातील, पण वेगवेगळ्या जाती-गटातील मंडळी यांच्या विरोधात तत्वापोटी अनेकदा लिहिले आहे. चांगले मित्र असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याही खटकणाऱ्या बाबीवर लिहिलं. जसे शरद पवार, अमित देशमुख (त्यांच्याच वर्तमानपत्रात) जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात देखील लिहिले आहे. हे करताना जयदत्तअण्णा क्षिरसागर, सतिश चव्हाण या राष्ट्रवादीतील मंडळींचे कौतुक देखील केले आहे. (विशेष म्हणजे, जन्मभूमी लातूर आणि कर्मभूमी बीड असल्याने दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख व गोपीनाथरावजी मुंडे यांच्याबाबत लिहिताना सुशील कुलकर्णी यांनी 'आमच्या भागाचे नेते' या प्रेमापोटी कधीही जाणीवपूर्वक टीकात्मक लिहिले नाही की, कौतुक करताना लेखणीही आखडती घेतली नाही, हा भाग वेगळा )

सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार यांच्याबाबतीत देखील असेच घडले. मोपलवार यांनी न केलेल्या गुन्हयात त्यांना शिक्षा देण्यात आली. बोरीवलीचा एक प्लॉट आणि त्याच्याशी संबंधीत व्यवहार या संबंधीचे बोलणे फोनमध्ये रेकॉर्ड झाले. ते विरोधी पक्षाच्या हातात दिले. विधीमंडळात गोंधळ झाला. मोपलवार यांना रजेवर पाठविण्यात आले. याही प्रकरणात सुशील ठाम होते व आज मोपलवार त्याच जागी पुनः रुजू झालेले आपण पाहतो आहोत.

मुळात मोपलवार यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागलेले प्रकरण कधीचे? तर मोपलवार कोकणचे विभागीय आयुक्त होते त्यावेळेसचे. मोपलवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, चौकशी झाली आणि चौकशीत एक गोष्ट लक्षात आली की, अशा प्लॉटचा कोणताही व्यवहार सरकार दरबारी कधी झालाच नाही. मोपलवार मराठवाडी अधिकारी म्हणून त्यांच्यासाठी लिहिलं आणि जे लिहिलं ते खरं आहे हे समोर आले आहे. मुद्रांक घोटाळ्यात मोपलवार आरोपी नव्हते, तर तक्रारकर्ते होते, हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. बोरीवली प्लॉट प्रकरणात असा व्यव्हार झालेलाच नाही हेही सिध्द झाले. 'ती' रेकॉर्डींग बनावट होती हे देखील सिध्द झाले. जो व्यक्ती हे सगळे करत होता तो पोलीस रेकॉर्डवर गुन्हेगार आहे, हे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर जे राजकारणी आरोप करत आहेत ते तेलगी कांडातील जामिनावर सुटलेले आरोपी आहेत हे देखील लपून राहिलेले नाही.

एक तरुण व ज्येष्ठ पोलीस अधिकारी संदीप भाजीभाकरे यांच्यावर उठलेली आरोपांची राळ आठवा. त्यावेळी सुशील यांनी नेहमीच्या चिकित्सक पद्धतीने अतिशय खोलात जाऊन याही प्रकरणाचा तळ गाठला व हे आरोप खोटे आणि षडयंत्राचा भाग असल्याचे लिहिले होते आणि तसेच घडले. आरोप करणारे आज कुठे आहेत आणि भाजीभाकरे यांना उच्च न्यायालयाने न्याय दिला आहे. त्यांना प्रमोशन देखील मिळाले. भाजीभाकरे प्रकरणात सुशील यांनी सत्य समोर आणले नसते तर एका प्रामाणिक आणि चांगला अधिकाऱ्याचा अकारण बळी गेला नसता का? याचाही विचार करावयास नकोय का?

औरंगाबादला पाणी टंचाई झाल्यावर उद्योगाचा पाणी पुरवठा बंद करण्यावर देखील विरोधी भूमिका घेतली होती.
उपरोक्त चार - पाच प्रकरणे व सुशील कुलकर्णी एक पत्रकार म्हणून मांडत असलेली भूमिका आणि निष्पन्न झालेले सत्य पाहता अगदी सुरूवातीला सुशील कुलकर्णी स्वतःबाबत 'मी दांभिक नाही, पण पाठराखण करतो, असे जे बोलतात त्यामागचे तथ्य स्पष्ट होते. चांगले काम करणाऱ्या नेते किंवा अधिकारी यांच्या पाठीशी सर्वानी उभे रहायला हवे. मात्र ते होताना दिसत नाही. टीका, टिप्पणी, उपरोधीक बोलणी सहन करूनही सुशील यांच्यासारखे लोक उभे राहतात, हे धाडसच आहे.

एका पुरोगामी विचारांचा वारसा लातूर शहराच्या हद्दीबाहेर, मराठवाडा व खान्देशात नेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुशील यांच्यासोबतीने मी व काही सहकारी मित्रांनी केला. मालक कार्पोरेट होता व त्यांचे सल्लागारही कार्पोरेट होते. अर्थात प्रत्येक व्यवहारात 'माझा टक्का' कितीचा? हा प्रश्न प्रत्येकानेच आधी विचारला. कार्पोरेट जगतातला 'रेफरन्स मनी' शब्द आम्हाला ग्रामीण पत्रकारांना कळला नाही. मालकाला त्याच्या बेईमान सहकाऱ्यांची सविस्तरपणे ई-मेलवर माहिती दिली. पण मेलसुद्धा 'मेला'... त्यामुळे प्रचंड व्यवहारी 'गुज्जू' लोक असलेल्या कार्पोरेट सल्लागारांचं व आमचं एकमत झालं नाही. 'रेफरन्स मनी' देणार नाही, यावर आम्ही ठाम राहिलो. थोडक्यात, आम्ही 'अव्यवहारी'च... मग काय अगदीच चक्क नवव्या महिन्यात 'गर्भपात' झाला. आमच्यासाठी तो खुप क्लेशदायक प्रकार होता.

'जर सत्य मांडणे जर 'फेवरीजम' असेल तर ते मी करतो आणि यापुढेही करीत राहीन हे सांगताना माझे मन जराही कचरत नाही. तटस्थ आणि निःपक्ष म्हणजे दिसेल त्याचा चावा घेत सुटणे हे मला तरी मुळीच मान्य नाही. मी तटस्थेचा दांभिकपणा करू शकत नाही', असे मित्रवर्य सुशील कुलकर्णी ठामपणे सांगतात.

गेली अनेक वर्षे सुशील यांच्या संपर्कात आहे व 'पुण्यनगरी आणि एकमत'च्या माध्यमातून अतिशय जवळून सुशील यांना अनुभवता आले, वाचता आले, ओळखता आले. अनेकजण त्यांच्याविषयी बोलताना ऐकले व पाहिलेही. वडिलकीच्या नात्याने व एक मित्र म्हणून माझे एकच सांगणे आहे की, 'मित्रा, काही असो, कसेही असो. कोणी काहीही व कसेही बोलले तरी मनावर घेऊ नये. वयाच्या 33/34 व्या वर्षी 'पुण्यनगरी'सारख्या राज्यातील 'नम्बर वन' क्रमांकाच्या वर्तमान पत्राचा संपादक होण्याचा मान मिळाल्याने अनेकांचा पोटशुळ उठला असेल. स्वतःच्या ज्येष्ठत्वाची टिमकी मिरवणारे काही आत्ममग्न पत्रकपंडितांच्या टिप्पणीने आपला मार्ग बदलु नको. तू दांभिक नाहीस, हे सर्वच मित्रांना माहित आहे व कोणी बोलतंय म्हणून फेवर करण्याचे थांबू नकोस', असा वाढदिवसानिमित्त प्रेमाचा सल्ला.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा ....!

  • विजयकुमार स्वामी, लातूर
    मो - 98227 32929

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.