मनपा निवडणुकीसाठी एमआयएमने कसली कंबर

खा.असदोद्दीन ओवेसी घेणार आढावा बैठक!

मनपा निवडणुकीसाठी एमआयएमने कसली कंबर

औरंगाबाद : सध्या निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे. निवडणुकीच्या दृष्टीने वॉर्ड रचनेचे कामही महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. आता या रेसमध्ये एमआयएम देखील मागे नाही. २०१५ च्या मनपा निवडणुकीत एमआयएमने घवघवीत यश मिळवले होते. येणाऱ्या निवडणुकीत यशातील सातत्य कायम राखण्यासाठी पक्षाने कंबर कसली असून, २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी पक्षप्रमुख खा.असदोद्दीन ओवेसी स्वतः शहरात आढावा बैठका घेणार आहेत.

सध्या राज्य शासनाच्या आदेशानुसार वॉर्ड रचनेचे काम सुरू आहे. मुस्लिमबहुल भागातील ७ ते ८ वॉर्ड प्रभागरचनेत तुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एक मुस्लिमबहुल वॉर्ड आणि उर्वरित दोन हिंदूबहुल वॉर्ड आले तर काय? असा प्रश्न इच्छुकांना पडला आहे. लोटाकारंजा वॉर्ड धावणी मोहल्ला आणि गुलमंडी या दोन वॉर्डांना जोडल्या गेला तर काय? असेही कयास लावले जात आहेत. चिस्तिया कॉलनी, शताब्दीनगर असे बाऊंड्रीवरील वॉर्ड संकटात येण्याची शक्यता आहे.

एमआयएमला नांदेड, परभणी येथे महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा घवघवीत यश मिळाले. दुसऱ्या निवडणुकीत पक्षाला मतदारांनी नाकारल्याचे चित्र पाहायला मिळाले. मागील आठवड्यात उदगीर येथील काही नगरसेवक राष्ट्रवादीत गेले. औरंगाबाद शहरातील तीन माजी नगरसेवक राष्ट्रवादीत गेले आहेत. आणखी काही पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत असल्याने एमआयएमची चिंता वाढतांना दिसून येत आहे. २०१५ मध्ये एमआयएमचे २४ नगरसेवक होते. मुस्लिमबहुल भागातील बहुतांश वॉर्डावर एमआयएमने कब्जा मिळविला होता. मागील पाच वर्षांमध्ये नगरसेवकांनी निधीतून अनेक कामे केली आहेत. आगामी निवडणूक एमआयएम पुन्हा विकासाच्या मुद्यावर लढणार असल्याची माहिती मिळत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.