लसीकरणात घोळ; ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना टाळाटाळ

४५ वर्षे वरील विशिष्ट व्याधी असणाऱ्या व्यक्तींकरिता लस देण्याचा नियम असताना त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना देखील लस देण्याचा पराक्रम सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

लसीकरणात घोळ; ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना टाळाटाळ

हिंगोली: कोव्हिड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाच्या वतीने ६० वर्षावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक लस देण्याचे काम सुरू आहे. याकरिता ऑनलाईन नोंदणी केलेले व ऑफलाइन पद्धतीने लसीकरणा करिता दाखल झालेल्या व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालयात लस दिली जात आहे. परंतु यामध्ये प्रशासनाच्या वतीने तोंड पाहून लस देण्याचा प्रकार सुरू असल्याची जोरदार चर्चा असून या प्रकाराला आज वाचा फुटल्यानंतर शल्यचिकित्सकांनी लक्ष घालीत ऑनलाइन नोंदणी केलेल्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाचा उपक्रम सुरू आहे. ६० वर्षावरील नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून लसीकरण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय ज्या व्यक्तींना ऑनलाइन नोंदणी करता आली नाही त्यांना देखील लसीकरणाच्या ठिकाणी लस देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. या व्यतिरिक्त ४५ वर्ष वरील विशिष्ट व्याधी असणाऱ्या व्यक्तींना देखील प्राधान्याने लस दिली जात आहे. परंतु शासकीय नियम आणि निर्देश धाब्यावर ठेवून सामान्य रुग्णालयात तोंड पाहून लस देण्याचे काम सुरू आहे. ज्या ज्येष्ठ व्यक्तींनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे अशा व्यक्तींना प्राधान्याने लस देण्याऐवजी ऑफलाइन पद्धतीने दाखल झालेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे.

४५ वर्षे वरील विशिष्ट व्याधी असणाऱ्या व्यक्तींकरिता लस देण्याचा नियम असताना त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना देखील लस देण्याचा पराक्रम सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. हा सर्व प्रकार प्रस्तुत प्रतिनिधीच्या कानावर पोहोचला असताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवी करीत या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन देत विषय बदलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेल्या व्यक्तींना प्राधान्याने लस देण्याचे आदेश देण्यात आले. वास्तविक शासनाकडून यासंदर्भात पूर्वीच निर्देश प्राप्त असताना संबंधित अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने लसीकरण मोहीम राबविल्यामुळे यामागे इतर कोणतेही हेतू होते याबाबत शंका निर्माण होत आहे.

सुविधांचा अभाव

लसीकरणाच्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांकरिता विविध सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना असताना प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी नागरिकांकरिता पिण्याच्या पाण्याची देखील सोय उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाला प्राप्त होणारा सुविधां करिताचा निधी गेला कुठे असा देखील प्रश्न निर्माण होतो.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.