मोदी अजेय का.

1 min read

मोदी अजेय का.

नोटाबंदीला वर्ष पूर्ण झालं आहे. नोटाबंदीला यश मिळालं असं सांगणा-या व्यक्तींना ते नेमके
कसे मिळाले हे स्पष्ट करून सांगता येत नाही. आणि अपयश मिळालं म्हणणा-या व्यक्तींना ते
नेमके कसे हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. याच पार्श्वभुमीवर गुजरातेत मोदींना यश
मिळणार की अपयश यावर जोरदार चर्चा सुरू आहे. मोदीवर टिका करताना मोदी विरोधक
मोदींच्या व्यक्तीगत आयुष्यावर वार करत आहेत तर मोदी समर्थक ( ज्याला सोशल
मिडीयावर भक्त असे म्हणतात) ते मोदींच्या व्यक्तीमत्वावर विसंबून आहेत.
गुजरातेत मोदींचा परत एकदा विजय होईल हे सांगायला कोणत्या भविष्यवेत्याची गरज नाही
असा दावा भाजप वर्तुळातून होत आहे. तर कॉंग्रेस यावेळी धक्का देईल असेही दावे कांही लोक
करत आहेत.
मोदी समर्थक आणि मोदी विरोधक या मध्ये देशाचे राजकारण विभागले आहे. मोदी विजयी का
होत आहेत? कॉंग्रेस पराभुत का होत आहे. राहूल गांधी यांचा पराभव पडत आहे की नाही?
राहूल यांची प्रतिमा पप्पू अशी प्रतिमा मोदी भक्तांनी केली आहे का? की राहूल यांनी आपल्या
वर्तनाने ही प्रतिमा अधीक भक्कम करून ठेवली आहे. या सगळ्या बाबींचा विचार कोणीच करत
नाही. आज मोदींना पराभुत करणे कठीण आहे. पण ही अशी स्थिती का आली? राज्यात
साधारण अशीच स्थिती आहे. 1995 च्या निवडणुकीचा अपवाद वगळता राज्यात कॉंग्रेसचा
दबदबा असताना कॉंग्रेस पराभवाच्या स्थितीत का जात आहे?
संपूर्ण देशात कॉंग्रेसची ताकद प्रबळ होती. भारतीय मतदारांना सक्षम पर्याय नव्हता. जेव्हा
जेंव्हा असा पर्याय निर्माण होण्याची शक्यता झाली तेंव्हा तेव्हा लोकांनी त्याला समर्थन
करण्याचा प्रयत्न केला आहे. देशात कुठेच कॉंग्रेसची सत्ता उखडली नाहीच असे झाले नाही.
1995 पर्यत महाराष्ट्रात देखील हिच स्थिती होती. शिवसेनेच्या रूपाने त्यावेळी पर्याय मिळाला
आणि सत्ता परिवर्तन झाले. ज्या ज्यावेळी असे सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला त्या
त्यावेळी सत्तेच्या सतत मिळण्याच्या लालसेने पुन्हा कांही नेत्यानी कॉंग्रेसची साथ धरली आणि
पर्याय संपला. महाराष्ट्रात शरद पवारांना लोकांनी कॉंग्रेस विरोध म्हणूनच समर्थन दिले होते.
मात्र पवारांनी पुन्हा कॉंग्रेसची साथ पकडली. दुस-या संताप प्रयोगानंतर देखील समविचारी
म्हणत कॉंग्रेससोबतच आघाडी केली.
जिथे असा समर्थ पर्याय मिळाला तिथे लोकांनी कॉंग्रेसची साथ कधीच सोडली आहे. दक्षिणेत
तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश ही दोन राज्य आहेत. पूर्वेत पंश्चिम बंगाल हा प्रांत आहे. तर
उत्तरेत बिहार आणि उत्तरप्रदेश या दोन राज्यात कॉंग्रेसची अवस्था बिकट आहे.

मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान गोवा या भाजपशासित राज्यात दिडदशके कॉंग्रेस सत्तेपासून दूर
आहे. लोक कॉंग्रेसला पर्याय शोधत नाहीत असे नाही तर पण अनेक वर्ष लोकांना तो समर्थ
पर्याय सापडत नव्हता. त्यामुळे राज्या राज्यात खंडीत जनादेश मिळत त्रिशंकू लोकसभा
आकाराला येत होती. मोरारजी देसाई, व्ही.पी. सिंह, चंद्रशेखर (कॉंग्रेसचा पाठींबा), एच.डी
देवेगौडा, ईंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी बाजपेयी अशी प्रयोग झाली. यातील अटलबिहारींच
एक सरकार वगळता कोणीच टर्म पूर्ण करू शकले नाही. आणि देशभरात आपली प्रतिमा
निर्माण करू शकले नाही. म्हणून पुन्हा दहा वर्ष मनमोहन सिंह सोनियांच्या नेतृत्वात पंतप्रधान
राहिले. त्यानंतर मात्र मोदी पर्वाला सुरूवात झाली. दक्षिणेतील राज्य आणि अल्पसंख्येने
खासदार असलेली पूर्वेतील राज्य वगळता भाजप देशभरात आपली ताकद दाखवू लागली.
कॉंग्रेसला पर्याय असलेला आणि खंबीर असलेला नेता नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशस्तरावर
मिळालेला होता.
कॉंग्रेसला पर्याय होऊ शकेल आणि तो कायम कॉंग्रेसविरोधी राहिल असा नेता नरेंद्र मोदी
यांच्या रूपात दिसत असल्याने स्थानिक छोट्या छोट्या पक्षाकडे असलेला मतदार आणि नेतृत्व
भाजपकडे आकृष्ट झाले. यात नवल वाटावे असे कांहीच नाही. वेगवेगळ्या पक्षात विभागला
गेलेला मतदार हेच कॉंग्रेस पक्षाचे बळ होता. त्याच बळावर आघात करत मोदींनी या
विभागल्या गेलेल्या मतदाराला आपल्याकडे वळवायला सुरूवात केली आणि भाजप देशभरात
एक मोठा पक्ष म्हणून पुढे आला. याच काळात कॉंग्रेसचे शिर्ष नेतृत्व उपहास, टिका, आणि
विनोदाचा धनी होत होते. राहूल गांधी हे कधीच गंभीर नेते वाटले नाहीत. त्यांची देहबोली,
विधानं ही त्यांच्या अपरिपक्वतेला उजागर करत होती. आणि भाजपकडून याचे अधीक मार्केटींग
करण्यात आले. मुलायम यांच्या घरात यादवी झाली, लालूप्रसाद यादव भ्रष्टाचाराच्या
प्रकरणात अडकत गेले. अम्मांचा मृत्यू झाला. या मोदी विरोधकांना असे फटके बसत होते.
भाजपकडे आणि रालोआकडे आकृष्ट होणा-या पक्षाची संख्या देखील वाढत होती. कॉंग्रेसकडे
सत्तेसाठी जाणारे आता मार्ग बदलून भाजपकडे जात आहेत. आणि मोदी प्रबळ होत गेले.
आज मोदींचा पराभव होणार नाही या निकषावर यासाठी यावे लागते की, मोदी ईतका
प्रभावी आणि पक्षासाठी काम करणारा नेता भाजप वगळता ईतर पक्षाकडे नाही. आज मोदी
गुजराथेत प्रचार करत आहेत शिवाय हिमाचलल मध्ये देखील धूम केली आहे. शिवाय कांही
महिण्यावर निवडणुक आलेल्या कर्नाटक मध्ये देखील त्यांचा प्रवास होऊ लागला आहे.
कर्नाटकातील निवडणुक ही तर कॉंग्रेसच्या गावी देखील नाही. पंजाब मध्ये कॉंग्रसेला यश
मिळाले खरे पण हे यश राहूल गांधी पंजाबात गेलेच नाहीत म्हणून पंजाब कॉंग्रेसचे कॅप्टन हे

यश मिळवू शकले असा प्रचार झाला. ईथेदेखील यश मिळूनही राहूल गांधींची प्रतिमा उजळ
होऊ शकली नाही. मोदींना पराभुत करायचे असेल तर मोदी ईतकी मेहनत घेऊन प्रतिमा
निर्माण करणारा नेता पुढे आला पाहिजे. मोदींना केवळ शिव्या देऊन हे साध्य होणार नाही.
मोदींना चुक ठरविण्याच्या नादात सगळेच मोदींचा प्रचार करत आहेत. मोदींचा कोट असा,
मोदी फेकतात. मोदींनी चहा विकलाच नाही. ते खोटे बोलतात, त्यांनी बायकोला धोका दिला
या विषयांना पुढे आणल्याने मोदींचे प्रतिमाभंजन होणार नाहीच तर उलट मोदी समर्थकांच्या
मनात अधीक घट्ट होईल. मोदी विरोध करताना सोशल मिडीयावर अधिकृत रित्या जो विनोद
घडतो आहे तो देखील विरोधकांच्या गंभीर प्रतिमेला तडा देत आहे. मोदींचे ट्विटर वरील
फॉलोअर्स खोटी असा आरोप झाला त्याला प्रत्युत्तर म्हणून तसाच आरोप राहूल गांधीवर
झाला. कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर वरून एक ओपनियन पोल घेतला गेला. ज्यात 1958 च्या
काळात पंडीत नेहरू यांनी भुतानमध्ये कोणत्या प्राण्यावर बसून प्रवास केला असा प्रश्न
विचारला गोला. ज्यात पर्याय म्हणून याक, हत्ती, उंट आणि गाढव असे उत्तर दिले गेले. खरे
उत्तर याक असतानाही 68 टक्के लोकांनी गाढव असे उत्तर देऊन कॉंग्रेसची टिंगल करण्याची
संधी सोडली नाही.
मोदींना तोड देताना प्रचंड मेहनत, राजकीय गांभिर्य आणि परत एकदा तो विश्वास निर्माण
करण्याची गरज आहे.
तूर्तास ईतकेच.