अन्नदात्याला मजूर बनविण्याचा मोदींचा डाव- खा.राजीव सातव

1 min read

अन्नदात्याला मजूर बनविण्याचा मोदींचा डाव- खा.राजीव सातव

शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधात हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉग्रेस पक्षाच्या वतीने आज शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

हिंगोली- शेतकरी आणि कामगार कायद्याच्या आडून देशातल्या अन्नदात्याला आणि कामगारांना वेठीस धरण्याचा डाव पंतप्रधान मोदींनी केला असल्याची घणाघाती टीका खा.राजीव सातव यांनी केली. हिंगोली येथे आयोजित कॉग्रेसच्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. शेतकरी व कामगार कायद्याच्या विरोधात हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉग्रेस पक्षाच्या वतीने आज शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
ठराविक कंपन्यांची एकाधिकारशाही निर्माण करून देशातील अन्नदात्याला देशोधडीला लावून मजूर बनविण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करीत आहे. सत्तर वर्षात कॉग्रेसने शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. ते सर्व निर्णय मोडीत काढत अदानी, अंबानी सारख्या लोकांचे खिसे भरण्याकरिता मोदी सरकार काम करीत आहे. बाजार समितीच्या माध्यमातून कॉग्रेसने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचे संरक्षण दिले होते. या माध्यमातून शेतकऱ्यांना आज पर्यंत शेती मालाच्या बाबतीत मोठा आधार मिळत होता. परंतु बाजार समित्या मोडीत काढून देशामध्ये कंपन्यांची एकाधिकारशाही ही निर्माण केली जात आहे. परिणामी कंपन्या शेतकऱयांच्या मालाचे भाव कारार पद्धतीने ठरवतील असे सातव म्हणाले.
भविष्यात शेतकऱ्यांना आपले उत्पादन कवडीमोल भावाने विकावे लागेल. मालकीच्या शेतात शेतकरी मजूर म्हणून काम करतील. हा कायदा म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा कायदा आहे. पंतप्रधान मोदींनी देशातील अनेक व्यवस्थांच्या खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. सत्तर वर्षांमध्ये कॉग्रेसने निर्माण केलेल्या अनेक सुविधा आज खाजगी कंपन्यांच्या खिशात घातल्या जात आहेत. विमानतळांचे खाजगीकरण केले जात आहे. भविष्यात अदानी आणि अंबानीच्या नावाने रेल्वे गाड्या धावतील. या माध्यमातून मात्र सर्वसामान्य जनतेची प्रचंड मोठी लूट होणार आहे. जनकल्याण करिता नोटबंदी आणि जीएसटी सारखे निर्णय मोदींनी देशावर लादले. परंतु याचा प्रत्यक्षात मात्र कुठलाही फायदा झाला नाही. उलट सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यापारी मात्र भिकेला लागले.
WhatsApp-Image-2020-10-02-at-3.30.18-PM
कामगार कायद्याच्या माध्यमातून कंपन्यांच्या हिताचे धोरण राबविले जात आहे. यामुळे कामगारांचे भविष्य असुरक्षित झाले आहे. देशात प्रचंड मोठा रोष निर्माण झाला आहे. हे कायदे रद्द करायचे असतील तर सर्वांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात जी मंडळी आवाज उठवतात त्यांचा आवाज दाबण्याचा हुकुमशाही प्रकार सुरू आहे. याच प्रकारातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी दडपण्याचा निषेधार्ह प्रकार केला. याचा तीव्र निषेध करताना येणाऱ्या काळात काँग्रेस केंद्र शासनाच्या विरोधात संपूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा खा.राजीव सातव यांनी दिला. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत देण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील यावेळी सातव यांनी सांगितले.
या आंदोलनासाठी उपस्थित असणाऱ्या निरीक्षक जितेंद्र देहाडे यांनीदेखील केंद्र शासनावर कडाडून टीका करताना देशातील संपूर्ण कामगारांना वेठबिगार बनविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. हा प्रकार मोडून काढायचा असेल तर सर्व शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांनी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले.
या आंदोलनामध्ये माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सदर कायद्याच्या विरोधात बाबत निवेदन सादर करण्यात आले.