'मिस्टर परफेक्शनिस्ट': अरविंद पाटील निलंगेकर...!

अरविंद पाटील यांच्या अचूक नियोजनाची साक्ष नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या कार्यक्रमाच्या वेळी अनुभवली. लातूर जिल्हयाच्या राजकारणात हा गुण दिलीपराव देशमुख यांच्यानंतर अरविंद पाटील यांच्यातच जाणवला...

'मिस्टर परफेक्शनिस्ट': अरविंद पाटील निलंगेकर...!

कसलीही कुसूर, उणीव न ठेवता, सगळी कामं टापटीप करणारा किंवा करून घेणारा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो. ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर व दिलीपराव देशमुख हे त्यातल्यापैकीच. आमिर खानही त्याच पठडीतला. असे अनेक आहेत, पण बोटावर मोजण्यासारखे... यात गेल्या काही काळापासून आणखी एक नाव जोडल्या गेलंय. ते म्हणजे अरविंद पाटील निलंगेकर. समस्त निलंगेकरांच्या माहितीतले अरविंद पाटील यांच्या 'परफेक्शनिस्ट'पणाची लातूर जिल्ह्यासह राज्याला भाजप सरकार आल्यानंतर खरी ओळख झाली.

अनेक राजकीय व सामाजिक कार्यक्रमात लातूरकरांना पाटील यांच्या 'परफेक्शनिस्ट'तेची प्रचिती आलेली आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औसा येथील जाहीर सभा असो की, भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मराठवाडास्तरीय बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांचा मेळावा. वलांडीतली केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा किंवा निलंगा येथील केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची निवडणूक प्रचार सभा हेही उदाहरण त्यापैकीच एक.
Arvind_patil_Nilangekar_Analyser-2
आरोग्य शिबीर आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत एक समर्पित कार्यकर्ता म्हणून अरविंद पाटील निलंगेकर यांचा वावर हा त्यांच्या संघटन कौशल्याची प्रचिती देणारा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीतील अटल आरोग्य शिबिरात कसलीही उणीव पडणार नाही, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी, परिचारिका यांना एकसूत्रात गुंफून केलेले नियोजन हा विशेष कौतुकाचा भाग ठरला. अरविंद पाटील यांच्यासारखा ग्रामीण भागातील एक सामान्य कार्यकर्ता असामान्य पद्धतीने काम करतो व तो यशस्वीपणे राबवतो, याची दखल वेळोवेळी केंद्रीय नेतृत्वाने घेतली.

अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून अरविंद पाटील कार्यरत आहेत. त्यांच्या सोबतीला जे अनेक कार्यकर्त्यांचे हात राबतात ते हात विशेष कौतुकपात्र आहेत. अक्का फाउंडेशनमध्ये काम करणारे कार्यकर्ते हे सामान्य घरातले आणि समाजाला पूर्णतः अपरिचित असे आहेत. गेल्या चार वर्षांपासून देशपातळीवर दखल घेतली जाणाऱ्या शिवजयंती उत्सवाचा आदर्श अन्य उत्सवकर्त्यांनीही घेतला आहे. मराठी माणसाच्या मनात स्वातंत्र्य व स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लातूरच्या क्रीडा संकुलात नामवंत चित्रकार, कलावंत व समाजसेवी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चितारलेल्या विश्वविक्रमी रांगोळीच्या मागील संकल्पना ही अरविंद पाटील यांचीच.

निलंगा येथे पिकांच्या माध्यमातून साकारलेली शिवप्रतिमासुद्धा विश्वविक्रमीच ठरली. गतवर्षीचा शिवजयंती सोहळ्याचे आयोजन अरविंद पाटील यांच्या कौटुंबिक ममता, जिव्हाळा व एकोप्याच्या भावनेचा त्याचबरोबर राजकीय, सामाजिक चातुर्याची एक प्रकारे साक्ष देणारा होता. राज्याच्या राजकारणात निलंगेकर घराणे आजोबा-नातू, काका-पुतण्या असा राजकीय संघर्षामुळे विशेष गाजला किंवा माध्यमांकडून गाजवला गेला. माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांचा राजकारणातील प्रवेश आजोबा डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याने झाला. पहिली बाजी संभाजीराव पाटील यांनी जिंकली, त्यामागे अरविंद पाटील यांना मानणारी तरुण फळी जशी होती, तशी दिवंगत माजी आमदार दिलीपराव पाटील उर्फ भाऊ यांच्याप्रति खुप मोठी आस्था व सदभावना असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर हा विजय मिळवता आला.
nilanga_shivaji_maharaj_rangoli
वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी संभाजीराव आमदार झाले. त्यानंतर संभाजीराव पाटील यांच्या २००९, २०१४ व २०१९ च्या निवडणुकांतल्या विजयात अरविंद पाटील यांचा वाटा सिंहाचा होता. राजकारणात कार्यरत कुठल्याही नेत्यांचा समर्थक हा एकाच वेळी पक्ष संघटनेतील अनेकांच्या व्यासपीठावर दिसतो. मात्र निलंग्याच्या राजकारणात कार्यकर्ता हा पूर्णपणे वेगळा आहे हे त्याचे वेगळेपण आहे. अरविंद पाटील यांचे मोठे बंधू संभाजीराव पाटील यांचे कार्यकर्ते वेगळे आणि अरविंद पाटील यांचे कार्यकर्ते पूर्णपणे वेगळेच आहेत. संभाजीरावांचे कार्यकर्ते हे राजकीय क्षेत्रातले तर अरविंद पाटील यांचे कार्यकर्ते हे सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणारे आहेत. प्रामुख्याने अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून ते कार्यरत असतात.

निलंगेकर घराण्यात मुख्यमंत्री पद राहिले तसेच खासदार पद, आमदार पद, मंत्री पदही राहिले. अरविंद पाटील यातल्या पैकी कुठल्याही पदावर नाहीत. मात्र, त्यांची लोकप्रियता ही सर्वांपेक्षा कांकणभर सरसच आहे. लोकांत मिसळण्याची कला व गुण वडिलांकडूनच मिळालेले आहेत.

दिवंगत भाऊ दिलीपराव पाटील यांच्याकडे १९८५ मधल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनपेक्षितपणे आमदारकी चालून आली. निलंग्याच्या राजकीय इतिहासात भाऊ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने कोणताही आमदार निवडून आलेला नाही. संभाजीराव पाटील यांचे आजोबा माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील हेही नाही आणि स्वतः संभाजीराव पाटील हेही भाऊंनी संपादित केलेले मताधिक्याच्या जवळपास पोहचू शकले नाहीत. भाऊंची काम करण्याची पद्धत आणि सर्वसामान्य लोकांत मिसळून काम करण्याची शैली ही खुपच आकर्षक व सर्वार्थाने वेगळी होती. त्याचा फायदा डॉ. शिवाजीराव पाटील यांना होत असे. नेमके त्याच पद्धतीची लोकप्रियता अरविंद पाटील यांना लाभलेली आहे. दिलीपराव पाटील सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीवर व खांद्यावर हात ठेवून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करायचे. तोच कित्ता अरविंद पाटील गिरवत आहेत. कसलेही पद नसताना कार्यकर्त्यांचे मोहोळ सतत त्यांच्या अवतीभवती घोंगावत असते.

बरं, कार्यकर्त्यांचा हा जमावडा कसल्या अपेक्षेने झालेला नसतो. ते त्यांच्या समोर ठाण मांडून बसलेले नसतात की त्यांचा शब्दही झेलायला आतुर नसतात. मुळात ते त्यांच्या मैफलीतही नसतात की नजरेसमोरही नसतात. फक्त वेळ पडली की एक आवाज दिला की, काही क्षणातच हजारो कार्यकर्ते 'अजिंठा'वर धावून जातात. कुठून गोळा होतात इतके कार्यकर्ते या प्रश्नाचे उत्तर 'अजिंठा'च्या आसपास बारकाईने लक्ष ठेवल्यास आपोआप मिळते. सामान्य कार्यकर्त्यांना जे प्रेम, जो आपलेपणा भाऊंनी दिलाय, तेच प्रेम व आपुलकीची वागणूक अरविंद पाटील यांनी दिलेले आहे.

सामान्य वडीलधाऱ्या कार्यकर्त्यांत 'छोटु पाटील' आणि तरुण कार्यकर्त्यांत 'छोटुभैय्या' म्हणून अरविंद पाटील यांना संबोधले जाते. खरं तर आपल्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील काम व कर्तृत्वाने इतके मोठे झाले आहेत. ज्याची दखल राज्य व केंद्रीय पातळीवरील नेतृत्वाने घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत मोठेपणाला दाद दिली आहे. तरीही ते निलंग्यातील सामान्य कार्यकर्त्यांसाठी अजूनही 'छोटु भैय्या'च आहेत. वडील दिलीपराव पाटील यांच्या इतकीच शिस्त व स्वभावातला करडेपणा अरविंद पाटील यांच्याही स्वभावात जाणवतो. संभाजीरावांच्या तुलनेत अरविंद पाटील हे कडक स्वभावाचे म्हणून कार्यकर्त्यांना परिचित आहेत. कुठल्याही योजना, प्रकल्पात अरविंद पाटील यांचे तनमनधनाने काम करण्याच्या वृत्तीचा कित्ता कार्यकर्तेही गिरवत असतात. कार्यकर्त्यांची हुशारी, क्षमता, गुण-अवगुण ओळखुन अरविंद पाटील कार्यकर्त्यांचा वापर योग्य कामात करून घेतात व त्याच्या बदल्यात मिळालेली कौतुकाची थाप लाखमोलाची ठरते.

एक घटना मला आठवते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची सभा निलंगा येथे होती आणि सभेच्या काही वेळ आधी हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोयल यांनी सभेला पोहचणे शक्य नसल्याचे कळवले. अरविंद पाटील यांना ही बाब कळली तेव्हा त्यांनी यंत्रणा इतक्या वेगाने हलवली की, पर्यायी हेलिकॉप्टरची सोय करून त्यांनी पियूष गोयल यांची अडचण दूर केली व निर्धारीत वेळी गोयल सभास्थानी पोहचतील, अशी सोय केली. इतकेच नव्हे तर परतीच्या प्रवासात अरविंद पाटील यांनी स्वतः गोयल यांना सोबत करत हैद्राबाद मार्गे नवी दिल्लीपर्यंत पोहचवले. गोयल यांनी अरविंद पाटील यांच्या या कौशल्यपूर्ण संघटन आणि नियोजनाचे कौतुक केले.

निलंगा येथे पर्जन्यवृष्टी महायज्ञ सोहळा प्रसंगी अरविंद पाटील यांच्या अचूक नियोजन व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या स्वभावाची प्रचिती आली. या सोहळ्यात यज्ञयागाचे नियोजन आणि त्यात एक लाख दाम्पत्याचा सहभाग हा कुतूहलाचा विषय ठरला. सर्व दाम्पत्याना महावस्त्रे, प्रसाद वाटप करणे हे जिकिरीचे काम होते. ते त्यांनी व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी लीलया पार पाडले. संपूर्ण एक आठवडाभर चाललेला महायज्ञ सोहळा कसलाही व्यत्यय न येऊ देता पार पाडला. याच दरम्यान लोकप्रिय नेत्या व केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या आकस्मिक निधनाचे दुःखद बातमी थडकली. याही परिस्थितीचे गांभीर्य व प्रसंगावधान राखून सुषमा स्वराज यांच्याप्रति शोकसंवेदना व्यक्त करून एक दिवस सर्व कार्यक्रम संस्थगित करण्यात आले व संपूर्ण मतदार संघात एकाच वेळी सुषमा स्वराज यांना सामूहिकपणे श्रद्धांजली वाहण्यात आली. पर्जन्यवृष्टी महायज्ञ सोहळ्यादरम्यान सलग सात दिवस पडद्याआड राहून सर्व विधी चोखपणे पार पडण्याचे कसब अरविंद पाटील यांनी साधले.

याच प्रकारचे नियोजन व कौशल्याची चुणूक नुकत्याच झालेल्या शिवजयंती निमित्त आयोजित सांस्कृतिक उत्सवादरम्यान दाखवली. 'पुन्हा सही रे सही' नाटकाचा प्रयोग होता आणि अभिनेते भरत जाधव यांच्यासह अन्य कलाकार व वाद्यवृंद घेऊन येणारे वाहन पुण्यापासून काही अंतरावर नादुरुस्त झाले. भरत जाधव यांनी दूरध्वनीवरून कार्यक्रमास पोहचणे शक्य नसल्याची असमर्थता दर्शवली. अशा वेळी अरविंद पाटील यांनी सविस्तर माहिती घेऊन यंत्रणा वेगाने हलवत पर्यायी वाहनांची सोय केल्याने कलाकार मंडळीना सकुशल निलंगा येथे कार्यक्रमस्थळी पोहचणे व वेळेत नाटक सादर करणे शक्य झाले. आदल्या दिवशी अवधूत गुप्ते यांचा 'शिवगर्जना' कार्यक्रम झाल्याने निलंगेकर रसिकांना 'पुन्हा सही रे सही' नाटकाची तीव्रतेने उत्सुकता होती. त्या उत्सुकतेवर विरजण पडणार नाही, याची काळजी अरविंद पाटील यांनी घेतली आणि याबाबतची माहितीही व्यासपीठावरून समस्त नाट्यप्रेमींना दिली, तेव्हा कलाकार आणि हजारो रसिकांनी टाळ्याच्या कडकडाटात अरविंद पाटील यांना कौतुकाची पावतीच दिली.
punha_sahi_re_sahi_natak_bharat_jadhav
'शिवगर्जना' हा शिवप्रेमींसाठी एक आगळा वेगळा संगीतोत्सव ठरला. पार्श्वगायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या समवेत गणेश स्तवन सादर करताना अरविंद पाटील यांनी स्वतः जो नृत्याविष्कार दाखवला, त्याच्या परिणामी संपूर्ण मैदानातील रसिकांनी चक्क ठेका धरला. एखादा नेता सार्वजनिक जीवनात वावरताना अशा पद्धतीने आपणही लोकांत मिसळून व्यासपीठावर नृत्य करतो, हे दुर्मिळ चित्र निलंगेकरांनी 'याचि देही याचि डोळा' अनुभवले. निलंगा तालुक्याच्या इतिहासात गेली चार वर्षे साजरी केली जाणारा शिवजयंती सोहळा, सोहळ्याची भव्य दिव्यता, सादरीकरण, नेटके नियोजन, शिस्त हा राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. याचे श्रेय निर्विवादपणे अरविंद पाटील यांना जाते. पुढील वर्षी देशाचे लक्ष वेधून घेणारा शिवजयंती सोहळा आयोजित करण्याचा मानस अरविंद पाटील यांनी बोलून दाखवला असल्याने त्याचीही उत्सुकता समस्त निलंगेकरांना लागून आहे.
avdhut_gupte_arvind_nilangekar
अरविंद पाटील यांच्या अचूक नियोजनाची साक्ष नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या कार्यक्रमाच्या वेळी अनुभवली. औशातली मोदी सभेचे व्यासपीठ कोणत्या दिशेने असावे. दुपारच्या वेळी सभा असल्याने ऊन कोणत्या दिशेने व त्याची तीव्रता किती जाणवेल. श्रोते किती वेळ एकचित्तपणे बसू शकतील, याचा विचार बारकाईने करून श्रोत्यांसाठी प्रत्येक खुर्चीस एक पाण्याची बाटली, प्रत्येकाला लिम्लेटच्या गोळ्या, सभा मंडपात फॅनची सोय तसेच व्यासपीठावर कुलर, टीव्ही संचाची सुविधा इत्यादींवर लक्ष दिले. लातूर जिल्हयाच्या राजकारणात हा गुण दिलीपराव देशमुख यांच्यानंतर अरविंद पाटील यांच्यातच जाणवला. अमित शहा यांच्या कार्यक्रमाच्या व निवासाच्या दरम्यानचा संपूर्ण कार्यक्रमही त्यांच्याच दूरदृष्टीचा भाग कौतुकास्पद ठरला....

कसल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आपले काम प्रामाणिकपणे पार पाडण्याचा हा गुण अरविंद पाटील यांना वडील दिलीप भाऊंकडून वारसाहक्काने मिळालेला आहे. भाऊ फक्त सहा महिन्यांसाठी आमदार राहिले. पण भाऊंनी आपल्या स्वभावाने जो गोतावळा निर्माण केला, जे प्रेम व आपुलकी, लोकप्रियता मिळवली, तीच अरविंद पाटील यांच्याही वाट्याला आलेली आहे, हे त्यांचे सौभाग्य होय. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी जी आत्मीयता आहे, ती समाजकारण-राजकारणात अभावानेच कोणाकोणाला लाभते. 'मला आमदारकी नको. मला खासदारकी नको. मला कसलेही पद नको की मंत्री पदही नको. कसलीही अपेक्षा नाही. केवळ निलंगेकर नागरिकांच्या जीवनात आनंद व डोळ्यात समाधान पहावयाचे आहे तसेच माता-भगिनी सुरक्षित व सुखी कशा राहतील, ते पहावयाचे आहे, असे अरविंद पाटील जाहीरपणे सांगतात. आज अरविंद पाटील उर्फ छोटु भैय्या यांचा वाढदिवस. यानिमित्त अरविंद पाटील यांचे सामान्य निलंगेकरांच्या जीवनात आनंद, सुख, सुरक्षिततेचे स्वप्न पूर्णत्वास जावो व आई तुळजाभवानी दीर्घायुरोग्य प्रदान करो, यांचे मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!

  • विजयकुमार स्वामी
    98227 32929

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.